वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले मठ मठकरवाडी येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. शुभम संतोष गुरव (वय २४, रा. पोंबुर्ले देवगड ) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी पडलेल्या पावसामुळे रस्ता ओला होता. त्यामुळे गाडी घसरून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे.
तालुक्यातील वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मुख्य मार्गांवर गुरुवारी सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्ता ओला असल्याने दुचाकी घसरून हा अपघात झाला. वेंगुर्ले येथून शुभम आपल्या दुचाकीने देवगड कडे जात होता. मात्र मठामध्ये रस्त्यावर दुचाकी घसरून समोर असलेल्या चारचाकी गाडीला धडकली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान दुचाकी स्लिप होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने अधिक उपचारासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात त्याला हलविले.
मठ भाजपा पदाधिकारी अजित नाईक, ग्रामपंचायत सदस्य शमिका मठकर, संतोष नांदोस्कर, रोहित बोवलेकर, रघुवीर बोवलेकर, संतोष तळवडेकर यांच्या सह स्थानिक ग्रामस्थांनी त्याला रुग्णालयात हलविण्यात मदत केली. रुग्णवाहिकेवरील चालक रमेश टेमकर आणि डॉ. मुंढे यांनी तत्काळ त्याला वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
वेंगुर्ला पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.












