राणे प्रकाशन प्रा.लि. ने ९ नोव्हेंबर २००८ रोजी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये दैनिक प्रहारने पहिलं पाऊलं टाकलं. तत्पूर्वी एक महिना अगोदर म्हणजे ऑक्टोबर २००८ मध्ये प्रहारच्या मुंबई आवृत्तीचा प्रकाशन ग्रॅण्ड सोहळा पार पडला. त्यानंतर कोकणात दैनिक प्रहारने टाकलेलं पहिलं पाऊल गेली सोळावर्षे अविरत वाटचाल सुरू आहे. आजच्या घडीला माध्यमांमध्ये प्रचंड वेगाने बदल घडत आहे. टी.व्ही माध्यमातील मनोरंजन चॅनेल बरोबरच दिवसभर अगदी २४ तास बातम्या देणारी अनेक चॅनेल निर्माण झाली. यामुळे तेव्हा आणि आजही माध्यमातील या बदलांमध्ये ‘प्रिंट’ मिडियाच काय होणार ? असा प्रश्न सतत चर्चेला येत राहिला. मात्र, पत्रकारीतेत उथळपणा दिर्घकाळ चालत नाही. या अशा माध्यमातील बदलांमध्ये टिकून रहाणे फारच अवघड होतं. त्यातच कोरोनाच संकट अचानक आलं. यात अनेक बड्या वृत्तपत्रांनी त्यांच्या आवृत्त्या बंद केल्या. कोरोनाचा काळ हा जसा अनेक उद्योग-व्यवसायांसाठी वाईट काळ होता. तसा तो वृत्तपत्र व्यवसायासाठीही होता. राणे प्रकाशन प्रा.लि. च्या दैनिक प्रहारने या अशा अवघड काळातही टिकून रहात असताना न थांबता डगमगता पुढे चालत रहाणे पसंद केलं. गेल्या सोळा वर्षांच्या वाटचालीत महाराष्ट्रासह कोकणात अनेक सामाजिक, राजकीय स्थित्यंतरे पाहिली, अनुभवली. मात्र, नियमित बातम्यां बरोबरच शनिवारी मनोरंजनाच्या क्षेत्रातील घडामोडी आणि नवीन मालिका, चित्रपट, नाटक या क्षेत्रातील रंजक लिखाण रिलॅक्सच्या माध्यमातून वाचकांपर्यंत देत आहोत. गुरूवारी शेअर मार्केट अर्थनितीवरील तज्ञांच मार्गदर्शक ठरणारे लेख, शेती क्षेत्रातील तरूणांनी नवीन शोध घेत वेगळी वाट चोखाळण्याचा केलेला प्रयत्न त्यांना प्रोत्साहन देण्याच काम प्रहार करीत आला आहे. सर्वसाधारणपणे रविवार हा आरामदायी दिवस असतो यासाठी रविवारच्या कोलाजच्या माध्यमातून वाचकांना दिवसभराचाच नव्हेतर संपूर्ण आठवडाभर पुरणारा वैचारिक खुराक प्रहारच्या माध्यमातून वाचकांना दिला जातो. दैनिक प्रहारने कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. या वाटचालीतही कोकणातील बेकारी नष्ट करण्यासाठी कोकणात पर्यटन उद्योगाबरोबरच नवीन उद्योग व्यवसायाची उभारणी होऊन त्यात कोकणातील तरूण कष्टातून, प्रयत्नातून आर्थिक समृद्धीचा मार्ग निर्माण झाला पाहिजे त्यासाठीचे प्रयत्न सतत होत राहिले आहेत. महाराष्ट्रात सत्तेतील स्थिरता ही विकासाच्या वाटचालीला निश्चितच पाठबळ देणारी असणार आहे. आज कोकणात पर्यटन व्यवसाय झपाट्याने बहरत आहे. या बदलामध्ये कोकणही बदलतय हे पहाताना निश्चितच आनंददायीच आहे. प्रहारनेही कोकणात वाटचाल करत असताना नाशिक, पुणे, रायगड इथेही जाण्याचा प्रयत्न केला आहे. याबरोबरच दैनिक प्रहार सोबतच प्रहार डिजिटल हे न्यूज पोर्टल पाच वर्षापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. प्रहार सोबतच प्रहार डिजिटल हे न्यूज पोर्टल कोकणात नंबर वन वर आहे. बातम्यांमधील विश्वासार्हता आणि प्रासंगिक लेखांमधील वैचारिकतेच्या आधारावर ही वाटचाल करत असताना प्रहारचे संपादकिय सल्लागार आदरणीय खासदार नारायण राणे, सौ.निलमताई राणे, राणे प्रकाशन प्रा.लि.चे संचालक आ.निलेश राणे, संचालक आ.नितेश राणे यासर्वांचे नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य राहिले आहे. या सोळावर्षांच्या वाटचालीत अनेक चढ-उतार पाहिले, अनुभवले. मात्र, प्रहार परिवारातील ‘टिमवर्क’ने ज्या प्रामाणिकतेने काम केलं त्यामुळे सोळावर्षांचा हा टप्पा पार करता आला. प्रहार, प्रहार डिजिटलच्या या वाटचालीत आमचे वाचक, जाहीरातदार, हितचिंतक यांनी जो विश्वास दाखवला त्यामुळेच १६ वर्षांची ही यशस्वी वाटचाल होऊ शकली. ९ नोव्हेंबरला प्रहारचा वर्धापनदिन असतो. परंतु यावर्षी निवडणुक आचारसंहितेमुळे आज ९ डिसेंबरला प्रहारचा वर्धापनदिन साजरा करीत आहोत. यानिमित्ताने सत्यनारायण पूजा प्रसाद आणि चहापान कार्यक्रम आयोजिला आहे. आपणा सर्वांच्या सदिच्छांसह उपस्थिती प्रार्थनिय आहेच.
आपण आजवर प्रहार, डिजिटलवर जो विश्वास, प्रेम आणि स्नेह जपला आहे ते प्रेम तसच ठेवत अधिकाधिक वृद्धींगत व्हावे !
संतोष वायंगणकर
निवासी संपादक
प्रहार, डिजिटल, कोकण












