भाट्ये येथे भरतीच्या उधाणाच्या लाटेत अडकलेल्या विद्यार्थ्याना मिळाले जीवदान

 

 

स्थानीक मच्छिमारांचे सहकार्य

रत्नागिरी | प्रतिनिधी
शहरानजीकच्या भाट्ये येथे मंगळवारी सायंकाळी भरतीच्या उधाणात अडकलेल्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांना स्थानिक मच्छिमार आणि पोलिस कर्मचार्‍यांनी सुखरुप बाहेर काढले.
मंगळवारी सायंकाळी पॉलिटेक्निक कॉलेजा चेतन प्रविण खडसे (मुळ रा.अमरावती सध्या रा.रत्नगिरी) आणि त्याची मैत्रिण दिक्षा योगेश सोनगिरे (मुळ रा.जळगाव सध्या रा.रत्नागिरी) ही दोघ फिरण्यासाठी भाट्ये येथील कोहीनूर पॉईंटच्या खालच्या बाजुला गेले होते. मात्र, तिथून येण्यासाठी त्यांना वेळ झाला. तसेच आता दिवस लवकर मावळत असल्याने अंधार पडू लागला आणि त्यातच समुद्राला भरती सुरु झाली. बघता बघता मोठ-मोठ्या लाटा किनार्‍यावर आदळू लागल्या. त्यामुळे या दोघांची पाचावर धारण बसली. त्यांनी तातडीने शहर पोलिसांकडे संपर्क साधत मदत मागितली.
पोलिसांनी तातडीने घनास्थळी धाव घेतली परंतू समुद्राच्या उधाणामुळे त्यांना बाहेर काढण्यात अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान, तेथील स्थानिक मच्छिमार बुरहान मजगावकर व सुभान बुड्ये या दोघांनी आपल्या जीवाची बाजी लावत या दोघांना सुखरुप बाहेर काढले.