लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा महत्वाकांक्षी प्रकल्प
चिपळूण : चिपळूणजवळ दळवटणे येथे छत्रपती शिवरायांचा एक महिना मुक्काम होता. त्यांची एक छावणी होती. राजे असे दीर्घकाळ अपवादानेच राहिले आहेत. कोकणभूमीला हा मान प्राप्त झाला, ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. शिवरायांप्रती आजही कोकणी माणसाची निष्ठा अशी आहे की, त्या जागेला आजही कोणी कुदळ-फावडे लावत नाही. शिवरायांचे पाय जेथे लागले ती जागा पवित्र, ही त्या मागची भावना आहे; मात्र हा इतिहास आपल्याला किती माहिती आहे तो जपायचा आहे, अशी भावना लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी व्यक्त केली.

श्री. चितळे म्हणाले, आम्ही संग्रहालय पुन्हा उभारण्याचा संकल्प केला आहे. त्याला साठे सर यांचे नावही देणार आहोत. त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या योगदानामुळे हा इतिहास जागवण्यासाठी पाठबळ मिळणार आहे. दळवटणे येथे शिवरायांचा तळ असलेल्या छावणीचा देखावा लेसर शोद्वारे या संग्रहालयात उभा करावयाचा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराने उत्तम संग्रहालय उभारले होते. कोकणाबाबत आपल्यालाच कमी माहिती असते. कोकणचा संपन्न इतिहास, भूगोल आणि कोकणची उत्तुंग माणसे यांची माहिती होण्यासाठी या संस्थेने संग्रहालय उभारले; मात्र २००५ आणि २०२१ ला आलेल्या महापुराने त्याची मोठी हानी झाली; मात्र आम्ही ते आता पुन्हा उभारणार आहोत. सातवाहन काळातील जाते या संग्रहालयाकडे आहे. पिनकोडचा जन्मदाता हा माखजनमधील वेलणकर आहेत; परंतु याची आपल्याला माहितीच नसते. ती लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कलादालनात मिळेल. त्यासाठी येथे कोकणातील भव्य व्यक्तीमत्वांचे तैलचित्रांचे दालन उभारले आहे.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे सर्वेसर्वा प्रकाश देशपांडे म्हणाले की, १६० वर्षांपूर्वी काशीकर यांनी चारजणांना घेऊन ग्रंथालय सुरू केले. आज त्याचे रूप भव्य झाले आहे. तरीही भरपूर काम करायचे आहे. सातवाहन काळातील जाते मिळाले म्हणजे सातवाहन काळाइतका जुना इतिहास कोकणाला आहे. संग्रहालयात अश्मयुगीन हत्यारे आहेत. डाळीएवढे सोन्याचे नाणे आहेत. लोकमान्यांचे पत्रही होते. पुरात ते गेले असले तरी सुदैवाने त्याची झेरॉक्स प्रत शिल्लक आहे. कोकणात काय विलक्षण लोक होऊन गेले हे ज्ञात व्हावे म्हणून ही तैलचित्रं उभारत आहोत. खुदीराम बोस यांच्यासारख्यांना बॉम्ब बनवून देणारा गणेश आठल्ये नावाचा क्रांतिकारक पश्चिम बंगालमधील एका जंगलात गेला; मात्र त्याची आठवण आपण ठेवली पाहिजे.
पुरातन वस्तू कशा मिळतात वा जमवाव्या लागतात याबद्दल देशपांडे यांनी मिश्किल उदाहरण दिले. देशपांडे म्हणाले, नव्या भैरीजवळ पुरातन म्हणजे सातवाहनकालीन जातं आहे, ही माहिती कळली होती. ते आणण्यासाठी उचलायला आम्ही गेलो तेव्हा तेथील एक वृद्धा आली. ती म्हणाली, जातं उचलायचं नाही. मला त्यात तुळस लावायची आहे. आम्ही त्यांना म्हटले, तुम्हाला तुळसच हवी आहे मग तुम्हाला पूर्ण नवीन वृंदावन देतो. त्यावर जाते देण्यास त्या तयार झाल्या. संग्रहालयात पुरातन रांजण, समयाही आहेत; मात्र हे सारे जमवणे ही खर्चिक बाब आहे.











