रुपेश पवार यांचा आरोप; राष्ट्रीय महामार्गाकडे कामाची चौकशी करण्याची मागणी
खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गाच्या खवटी ते परशुराम घाट या ४४ किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणात तब्बल १०० हून अधिक ठिकाणी काँक्रिटीकरण रस्ता दुभंगला आहे. याबाबत भरणे येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंत्यांना निवेदन चौपदरीकरणातील चुकीच्या व निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी केली आहे.
खेड तालुक्यात खवटीपासून परशुराम घाटापर्यंतचे चौपदरीकरण पूर्ण झाले तरी महामार्ग ठिकठिकाणी दुभंगत आहे. चौपदरीकरण कामाचा दर्जा तपासणाऱ्या विभागातर्फे चौकशी न करताच मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे. खवटीपासून परशुराम दरम्यानच्या चौपदरीकरणाचे काम कल्याण टोलवेज कंपनीने केले असून, अनेक ठिकाणी निकृष्ट काम झाल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.
महामार्गावरील भरणे-वेरळ झाल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यालगतची संरक्षक भिंत एक ते दीड फूट सरकली आहे, असा आरोपही पवार यांनी केला आहे.
दरम्यान जगबुडी नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू होताच काही महिन्यातच मध्यभागी खड्डा पडल्याने वाहनांना ब्रेक लावण्यात आला. याठिकाणी गर्डर बसवून तात्पुरती मलमपट्टी करण्यापलीकडे काहीच केलेले नाही. त्याचबरोबर महामार्गावरील भोस्ते घाटातील मुख्य वळणदार रस्त्यावर एका बाजूला उंच डोंगर असून, दुसऱ्या बाजूस सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली आहे. हे कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे
याबाबत टीकेची झोड उठल्यानंतर ठेकेदार धारक कंपनीने सिमेंट काँक्रीटचा माल टाकून पडलेल्या भेगा तात्पुरत्या बुजविण्याचा प्रयत्न केला. परशुराम घाट हद्दीत सर्व्हिस रोडची उभारणी जुन्या रस्त्यावर केली असून, हे कामही दर्जाहीन झाल्याचा आरोप रुपेश पवार यांनी केला आहे.










