
कोल्हापूर गंगावेश येथील सुभाष कुलकर्णी यांना करणीच्या नावाखाली एका भोंदूबाबा असलेल्या दादा पाटील यांच्या टोळक्याने कुलकर्णींना लाखो रूपयांचा गंडा घातला. अर्थात अंधश्रद्धेच्या नादी लागलेल्या सुभाष कुलकर्णी यांची झालेली ही फसवणुक आहे. भोंदूबाबा आणि त्यांच्या टोळक्यांकडून लुबाडणुकीचे प्रकार हे काही महाराष्ट्राला नवीन नाहीत. फसवणुकीच्या अशा असंख्य घटना राज्यभरात घडत असतात. ऑनलाईन फसवणुकीत तर शिक्षित असलेल्यांची फसवणूक होतेय. शेअर मार्केटमधून दामदुप्पट पैसे मिळवण्यातून ही फसवणुक होत असते. बरं अशा घटना घडत असताना तरीही फसवणुकीचे प्रकार काही कमी होत नाहीत. तसंच अंधश्रद्धेने समाजात भोंदूबाबा नेहमीच फसवत असतात. रत्नागिरीच्या दादा पाटील महाराज याचे कारनामेही काही कमी नाहीत. अनेकांना या दादा पाटील महाराज याने आपल्या कारनाम्यात गुंतवले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अशाच प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील पोलिस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांचा असलेल्या सहभागाने दस्तुरखुद्द पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्यासह साऱ्या पोलिस दलाला आश्चर्य वाटल्यावाचून रहाणार नाही. दरवेश पाडळी (ता. हातकणंगले) गावच्या असलेल्या तृप्ती मुळीक यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये यात फसवणुक झालेले सुभाष कुलकर्णी यांना खाकीवर्दीचा धाक दाखविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तेरा वर्षापूर्वी म्हणजे २०११ साली तृप्ती मुळीक सिंधुदुर्ग पोलिसदलात दाखल झाली. सिंधुदुर्ग पोलिस दलातील महिला चालक म्हणून तृप्ती
मुळीक यांचं फार कौतुकही झालं. २०२१ मध्ये सिंधुदुर्गात जिल्हा नियोजन व विकास मंडळाची बैठक झालेली या बैठकीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार सिंधुदुर्गात आले होते. तेव्हा त्यांच्या वाहनाचे सारथ्य पोलिस तृप्ती मुळीक यांनीच केले होते. त्यामुळे साहजिकच तृप्ती मुळीक यांची एक वेगळी क्रेझ सिंधुदुर्ग पोलिसदलात निर्माण झाली होती. कदाचित याच क्रेझचा गैरफायदा तृप्ती मुळीक यांनी घेतला असावा.
फसवणुक झालेल्या सुभाष कुलकर्णी यांना आपली वरपर्यंत कशी ओळख आहे हे दाखवण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या सोबतचा फोटोही त्यांनी उपयोगात आणल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोल्हापूर पोलिसांच्या तपासात तृप्ती मुळीक हिचा या प्रकरणात सहभाग कसा आहे हे दर्शविणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तृप्ती मुळीक यांनी फसवणुक झालेल्या सुभाष कुलकर्णी यांचा विश्वास बसला पाहिजे यासाठी दोन-चारवेळा पोलिसी खाकीवर्दीमध्ये श्री.कुलकर्णी यांच्यासमोर गेल्या आहेत.
दादा पाटील महाराज या भोंदूबाबाच्या लूट प्रकरणात जी लूटमारीसाठी मदत करता येईल ती सर्व मदत पोलिस तृप्ती मुळीक यांनी दादा पाटील महाराज टोळक्याला केली आहे. गेली दिड-दोन महिने हे सर्व प्रकरण कोल्हापूर पोलिसांच्या तपासात आहे. खाकीवर्दीचा गैरवापर तृप्ती मुळीक यांनी केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या टोळीचा म्होरक्या हा दादा पाटील महाराज हा असला तरीही ही ९ जणांच्या टोळीने सुभाष कुलकर्णी यांना लुटले आहे. दादा पाटील महाराज यांने काळी जादू, करणी काढण्याचा धंदाच मांडला होता. या सर्व
प्रकरणात पोलिस तृप्ती मुळीक यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळेच
कोल्हापूर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. तृप्ती मुळीक हिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी तृप्ती मुळीक हिला पोलिसी सेवेतून निलंबित केले आहे. संशयित तृप्ती मुळीक यांचा पोलिस तपासात या फसवणुक प्रकरणात सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, तरीही पोलिस तृप्ती मुळीक हिलाच या संपूर्ण प्रकरणात फसवणुकीने गुंतविले आहे का? याचा तपासही यानिमित्ताने होऊन जे आहे ते स्पष्ट होईल. मात्र, परंतु संशयित तृप्ती मुळीक हिच्या कोल्हापूर पोलिसांच्या अटकेच्या कारवाईने सिंधुदुर्ग पोलिसांची खाकीवर्दी शरमिंदी झाली आहे. खाकीवर्दीवर समाजाचा आजही विश्वास आहे. हा विश्वास कायम राहिला पाहिजे. समाज आजही खाकीवर्दीला आपला आधार म्हणूनच पहात आहे. यामुळे संशयित तृप्ती मुळीकच्या कृतीने वर्दी डागाळली आहे. भविष्यात असं काही घडणार नाही हे पहाण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.












