महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्री. नारायणराव राणे साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक परखड, जिद्दी आणि कामगिरीवर विश्वास ठेवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. १० एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाकडे आणि कारकिर्दीकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे…सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि आज खासदार या प्रवासात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने वेगळी छाप निर्माण केली आहे. आदरणीय राणे साहेब म्हणजे निर्णयक्षम नेतृत्वाचे एक प्रतिक आहेत. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या राणे साहेबांनी सुरुवातीला स्थानिक पातळीवरून राजकारणात पाय रोवले. मुंबई महानगरातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली. शाखाप्रमुख ते नगरसेवक, आमदार असा त्यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला असला, तरी प्रेरणादायी आणि नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांसाठी आदर्शवत असाच आहे.
सन १९९९ मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारताना आदरणीय राणे साहेबांसमोर अनेक आव्हाने होती. अल्पकालीन कार्यकाळ असूनही त्यांनी घेतलेले निर्णय दूरदृष्टी दाखवणारे होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला. सरकारी यंत्रणा अधिक उत्तरदायी आणि गतिमान करण्यासाठी त्यांनी कठोर निर्णय घेतले. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी गुन्हेगारीवर कठोर कारवाई केली. मुंबईसारख्या महानगरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम बनवले. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे आणि ठाम भूमिकेमुळे प्रशासनात शिस्त निर्माण झाली.
महाराष्ट्राच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय
राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात उद्योग आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न झाले. औद्योगिक विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळाली. शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध योजनांना त्यांनी गती दिली. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली. त्यांच्या कार्यकाळात प्रशासनात निर्णयक्षमता, वेग आणि परिणामकारकता यांचा संगम दिसून आला. हीच त्यांची खास ओळख ठरली.
केंद्रीय मंत्री म्हणून प्रभावी कामगिरी
केंद्रीय पातळीवर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नारायण राणे साहेबांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून काम पाहिले. या पदावर असताना त्यांनी भारताच्या उद्योग क्षेत्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यावर त्यांनी भर दिला. देशात उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना देण्याकरिता त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे अधिक प्रभावी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला गती मिळाली. उद्योग क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली उद्योग क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक वेगाने सुरू झाली.
खासदार म्हणून जनसेवेची परंपरा
राणे साहेब आज रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार म्हणूनही आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. कोकणातील पायाभूत सुविधा, पर्यटन, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रात विकास घडवून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. स्थानिक समस्यांवर त्वरित तोडगा काढणे आणि जनतेशी थेट संवाद ठेवणे ही त्यांची कार्यशैली आहे. चिपळूण आणि रत्नागिरी येथे ऑक्टोबर २०२५ मध्ये आदरणीय राणे साहेबांनी घेतलेल्या जनता दरबारात त्यांच्या या कार्यशैलीची झलक जवळून अनुभवता आली.
व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्वशैली
स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता आणि कामाचा धडाका ही आदरणीय राणे साहेबांची ओळख. त्यांनी नेहमीच संघर्षाला संधी मानून पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले, परंतु प्रत्येक वेळी त्यांनी नव्या जोमाने पुनरागमन केले. त्यांच्या नेतृत्वात एक ठामपणा आणि कार्यक्षमतेची जाणीव दिसून येते. कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा जवळचा संबंध आणि जनतेसाठी काम करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राणे साहेबांचा राजकीय प्रवास हा जिद्द, संघर्ष आणि यश यांचा प्रेरणादायी आलेख आहे. मुख्यमंत्रीपदापासून केंद्रीय मंत्री पदापर्यंत आणि आज खासदार म्हणून ते सतत जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यावर आदरणीय राणे साहेबांचे विशेष प्रेम आहे, हे त्यांच्या प्रत्येक भेटीतून मला जाणवले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे, हे मी माझे भाग्य समजतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याला आणि योगदानाला सलाम करताना एकच भावना व्यक्त होते, ती म्हणजे…नेतृत्व असेच असावे, जे कठोर निर्णय घेते, विकासाला गती देते आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरते. आदरणीय नारायणराव राणे साहेबांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
-श्री. प्रशांत बबन यादव
जिल्हाध्यक्ष, भाजप, रत्नागिरी दक्षिण जिल्हा











