आरवली च्या उड्डाणपुलावर रस्त्याला भेगा

 

माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या उड्डाणपूवर रस्त्याला भेगा पडल्याने चिंता व्यक्त होत आहे.
चिपळूण मध्ये उड्डाणपूलाचा भाग कोसळल्याच्या घटना ताजा असताना देखील,उड्डाणपुलाच्या बांधकामकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.आरवली येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून उड्डाणपुलापर्यंत रस्त्याची उंची वाढवण्यात आली आहे.परंतु हे बांधकाम निकृष्ट होत असल्याचे रस्त्याला पडलेल्या भेगांवरून कळून येत आहे.यातील काही भेगा डांबराने बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.शासकीय तिजोरीतून कोट्यवधी खर्च करून अशा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उड्डाणपूल नवीन असल्यापासून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

 

पावसाळ्यामध्ये पुलाखालील भाग पाण्याने वाहून गेला होता.त्याठिकाणी संबंधित ठेकेदाराने मातीचे भराव आणून टाकले होते.एकूणच आरवली असो वा मुंबई गोवा महामार्गाचे अन्य उड्डाणपूल असो,या उड्डाणपुलांच्या बांधकामावेळी प्रवासी हित कितपत जपले जात आहे हे प्रश्नचिन्हच आहे.भेगा पडलेल्या या रस्त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांपासून,प्रांत ,तहसीलदार, आमदार,खासदार,सगळेच अधिकारी आणि लोकप्रतिनिधी येजा करत असतात.परंतु याकडे दुर्लक्ष होतसल्याचे चित्र आहे.
आरवली उड्डाणपुलाच्या कामाचे स्ट्रकचरल ऑडिट करावे अशी मागणी येथील ग्रामस्थ व प्रवाशांमधून होत आहे.