
राजापूर : कातळशिल्पे ही मानवाच्या हजारो वर्षांपूर्वीच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा सांगतात. या पार्श्वभूमीवर मानवी देहाची ठेवण असणारी तलवार घेऊन योद्ध्याच्या भूमिकेमध्ये असणारी मानवी आकृती तसेच मानवी हाताचा पंजा अशी दोन कातळशिल्पे तालुक्यातील खरवते येथे आढळून आली आहेत.
खरवते गावच्या सड्यावरील जांभ्या दगडाच्या कातळामध्ये कोरलेली ही वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्प पहिल्यांदा आढळून आली आहेत. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत या कातळशिल्पांसह सड्यावरील जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी खरवते ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.
निसर्गयात्री संस्थाप्रमुख, कातळशिल्प संशोधक सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि खरवते येथील ज्येेष्ठ ग्रामस्थ गंगाराम चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप, ग्रामपंचायत सदस्य किशोर चौगुले, संतोष चौगुले, जान्हवी माटल, सत्यवती बावकर, वैशाली चौगुले, ग्रामपंचायत अधिकारी नेहा कुडाळी, ग्रामपंचायत कर्मचारी देवीदास उबाळे, संजय माटल, केंद्रचालक भक्ती माटल, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षक चैत्रा गुरव, पर्यावरणप्रेमी प्रशांत चौगुले यांनी या कातळशिल्पांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबविली. त्यातून या वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्पांचा शोध लागल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी कुडाळी यांनी दिली. खरवते येथील सड्यावर आढळून आलेले कातळशिल्पांमध्ये मानवी देहाची ठेवण असणारे तलवार घेऊन योद्ध्याच्या भूमिकेत असणार्या मानवाकृतीसह मानवी हाताचा पंजा यांचा समावेश आहे.
मानवाकृती कातळशिल्प 7 फूट लांब
मानवाकृती कातळशिल्प 7 फूट लांब आणि 4 फूट रुंद आहे तर मानवी हाताचा पंजा 1 फूट लांब आणि अर्धा फूट रूंद आकाराचा असल्याची माहिती कुडाळी यांनी दिली.












