महाभारत : नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी

 

 

रत्नागिरीत कीर्तनसंध्या उपक्रम गेली १३ वर्षे सुरू असून, राष्ट्रीयकीर्तनकार ह. भ. प विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे यांच्या अमोघवाणीतून भारतीय इतिहासाची सुवर्णपाने उलगडण्यात आली. चौदावाकीर्तनसंध्या महोत्सव आठ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत होणारअसून, त्यात ‘महाभारत’ हा विषय मांडण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर, ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांनी लिहिलेलीमहाभारताची थोडक्यात ओळख करून देणारी आणि अपरिचित गोष्टीसांगणारी १८ भागांची लेखमाला आजपासून प्रसिद्ध करत आहोत. 

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी

ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा नववा भाग…
………….
महाभारतातील अर्जुनाच्या रथाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. अर्जुन मागे युद्धसज्ज स्थितीत उभा आहे आणि श्री भगवंत रथाचे सारथ्य करीत आहेत. या चित्रातून आपल्याला बोध केला आहे, की आपला जीवनरथ देवांच्या हाती द्या. कर्म करीत राहा. ‘देवाच्या इच्छेने वर्तावे । देव करील ते मानावे । मग सहजचि स्वभावे । कृपाळू देव ।।’ या वचनाप्रमाणे जगण्याचा अभ्यास करावा. भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे गुरू, सखा, सर्वस्वच होते. अर्जुन श्री भगवंतांच्या नित्य अनुसंधानात असे. त्यामुळे श्री भगवंतांचेही अर्जुनावर मोठे प्रेम होते. अर्जुनाच्या विविध नावांतून आपण भगवंतांना आवश्यक असणारे तीन गुण समजून घेऊ या. अर्जुन या शब्दाचा अर्थ सरळ मनाचा असा आहे. अर्जुनाचे आणखी एक नाव गुडाकेश असे आहे. याचा अर्थ ज्याची झोप त्याच्या ताब्यात आहे तो, अर्थात ठरावीक काळ झोप घेणारा. अर्जुनाचे तिसरे नाव धनंजय. याचा अर्थ ज्याने धनावर विजय मिळवला आहे, म्हणजे धनाच्या आसक्तीवर विजय मिळवला आहे असा. थोडक्यात, सरळ मनाचा, झोप आणि भूक यांवर नियंत्रण ठेवणारा आणि आसक्तीवर मात करणारा भक्त देवांना प्रिय असतो. अशा भक्तांची लक्षणे समजून घेण्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेचा बारावा अध्याय जरूर अभ्यासावा. आपल्या प्रिय भक्ताचे कल्याण करण्यासाठी श्री भगवंत सदैव तत्पर असतात. अशा अनेक कथा महाभारतात आढळतात. त्यातीलच एक छोटी कथा आज सांगतो.
अठराव्या दिवशी महाभारताचे युद्ध संपले आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला घेऊन छावणीकडे परत आले. परत आल्यानंतर ते म्हणाले, ‘अर्जुना, पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सारथी धर्माप्रमाणे मी खाली उतरून रथातून हात देऊन तुला खाली उतरवत होतो; पण आज मला कंटाळा आला आहे. आज तू खाली उतर आणि मला हात देऊन खाली उतरव.’ हे ऐकून अर्जुनाला अत्यंत आनंद झाला. तो म्हणाला, ‘देवा, सर्व दिवस मला आपण हात देऊन उतरवत होतात. तेव्हा खूप संकोचल्यासारखे होत होते. आज माझ्या आवडीचे काम मला मिळाले.’ असे म्हणून अर्जुन खाली उतरला. त्याने श्री भगवंतांना रथातून आदरपूर्वक खाली उतरवले. अर्जुनाचा हात हातात घेऊन देव रथापासून चारच पावले पुढे गेले आणि तो रथ घोड्यांसह जळून भस्मसात झाला. अर्जुन आश्चर्यचकित झाला. देव म्हणाले, ‘अर्जुना, या रथावर भीष्म, द्रोण, कर्ण यांच्यासारख्या अनेक योद्ध्यांची अनेक दाहक शस्त्रे आदळली आहेत; पण रथावर मी आरूढ झालो असल्यामुळे, त्या शस्त्रांचा परिणाम झाला नाही. आज मात्र युद्ध संपल्यामुळे ती शस्त्रे परिणाम दाखवणार होतीच. जर मी आधी उतरलो असतो तर रथासह तूही भस्मसात झाला असतास. म्हणून मी आधी तुला उतरवले आणि मग मी खाली उतरलो.’
वाचकहो, संपूर्ण महाभारतातून भगवान श्रीकृष्णांना वजा केले, तर महाभारतात काहीच शिल्लक राहणार नाही. श्री भगवंतांचे युद्धविषयक डावपेच, त्यांनी केलेली शिष्टाई, आपल्या अनन्यशरण भक्तांचे वेळोवेळी केलेले रक्षण हे सारेच थक्क करणारे आहे. आपण बालवयापासून हे रामायण-महाभारत ऐकले आहे; पण त्यातील कथांचा कधी विचार केला नाही. या कीर्तनसंध्या उपक्रमाच्या निमित्ताने असे चिंतन आपणा सर्वांकडून घडायला लागावे, हीच परमात्मा भगवान श्रीकृष्णचरणी प्रार्थना.

– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)


ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा आठवा भाग…

प्रतिज्ञा भगवान श्रीकृष्णांची
………….
अर्जुनाने केलेली जयद्रथवधाची प्रतिज्ञा भगवान श्रीकृष्णांनी कशी पूर्ण केली हे मागच्या लेखात आपण पाहिले. आज अर्जुनाच्या दोन प्रतिज्ञांची कथा बघू या.
महाभारत युद्धामध्ये एक दिवस महारथी कर्ण आणि धर्मराज युधिष्ठिर यांच्यात युद्ध झाले. या युद्धामध्ये कर्णाने युधिष्ठिराचा लीलया पराभव केला. आपल्या धनुष्याची प्रत्यंचा त्याने युधिष्ठिराच्या गळ्यात अडकवली आणि आणि म्हणाला ‘माझ्याशी युद्ध करणे हे तुझ्या आवाक्यातील काम नाही. तेव्हा तू तुझ्या छावणीत जा, आराम कर आणि अर्जुनाला लढायला पाठव.’ पराभवापेक्षा कर्णाचे शब्द युधिष्ठिराच्या मनावर आघात करून गेले आणि तो आपल्या छावणीकडे परतला.
इकडे युद्ध करत असताना आपल्या ज्येष्ठ बंधूंचा रथ कोठेच दिसत नाही हे पाहून अर्जुनाने भगवंतांना आपला रथ युधिष्ठिराच्या छावणीकडे न्यायला सांगितले. त्याप्रमाणे हे दोघे धर्मराजाच्या छावणीजवळ आले. त्यांना पाहून युधिष्ठिराला वाटले, अर्जुन कर्णाला मारून ती आनंदवार्ता घेऊन आला आहे. म्हणून त्याने धावत पुढे येऊन अर्जुनाचे अभिनंदन केले; पण अर्जुन म्हणाला, ‘माझा आणि कर्णाचा सामनाच अजून झाला नाही.’ हे ऐकल्यावर धर्मराजाचा राग अनावर झाला आणि त्याने अर्जुनाचा आणि त्याच्या गांडीव धनुष्याचा धिक्कार केला. हे शब्द ऐकून अर्जुनाने आपल्या म्यानातून तलवार बाहेर काढली आणि तो धर्मराजाकडे आवेशाने जाऊ लागला. अर्जुनाचा संतप्त चेहरा पाहून भगवान श्रीकृष्णाने त्याला विचारले, ‘तू हे काय करतोयस?’ त्यावर अर्जुन म्हणाला, ‘माझी प्रतिज्ञा आहे, की जो कोणी माझ्या धनुष्याचा धिक्कार करील त्याला मी जिवंत ठेवणार नाही. म्हणून मी आता धर्मराजाला मारणार आहे.’ भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ‘त्यासाठी तुला शस्त्रांची गरज नाही. आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असणाऱ्या माणसाला नावे ठेवली, शिव्या दिल्या तरी त्याचा वध केल्यासारखे होते. तेव्हा तू धर्मराजाला शिव्या दे. म्हणजे प्रत्यक्ष न मारता त्याला मारल्यासारखे होईल.’ अर्जुनाने त्याप्रमाणे युधिष्ठिराला बऱ्याच गोष्टी सुनावल्या.
थोडा वेळ झाल्यावर अर्जुनाने पुन्हा तलवार उपसली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ‘आता काय झाले?’ त्यावर अर्जुन म्हणाला, ‘माझी दुसरी प्रतिज्ञा आहे, की जो कोणी माझ्या दादाला नावे ठेवील, त्याला मी जिवंत ठेवणार नाही. त्यामुळे मी स्वतः आत्महत्या करणार आहे.’ पुन्हा भगवंतांनी सांगितले, ‘आत्महत्या हे पाप आहे, तेव्हा ते तू करू नकोस. त्याऐवजी तू स्वतःची अति स्तुती कर, ज्यामुळे आत्महत्या केल्यासारखे होईल.’ त्याप्रमाणे अर्जुनाने आपली अवास्तव स्तुती केली. या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण उपस्थित नसते, तर काय झाले असते? आपल्या प्रतिज्ञेने आपणच अडचणीत येतो, हे अर्जुनाच्या अनेक वेळा लक्षात आले नाही; पण त्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णानेच त्यांना वाचवले. स्वतः भगवान श्रीकृष्णांची एक प्रतिज्ञा होती, की ‘या युद्धामध्ये मी शस्त्र हाती घेणार नाही, तर युक्तीच्या गोष्टी सांगून मार्गदर्शन करीन;’ पण पितामह भीष्मांच्या बाणांनी अर्जुन घायाळ झाला आहे, बेशुद्ध पडला आहे, हे भगवान श्रीकृष्णांनी पाहिले, तेव्हा त्यांनी रथाचे चाक उचलून भीष्मांवर चाल केली होती. थोडक्यात भगवंतांना आपल्या भक्ताचे रक्षण हे आपल्या प्रतिज्ञेपेक्षा महत्त्वाचे वाटत होते. आपण या कथांमधून हेच लक्षात घ्यायचे, की स्वतःच्या प्रतिज्ञापूर्तीपेक्षा लोकांचे, देशाचे कल्याण हे महत्त्वाचे आहे.

– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)


ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा सातवा भाग…

सखा माझा नारायण
………….
महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे नाते विलक्षण आहे. पहिल्या कथांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे जिवलग मित्रांप्रमाणे वागताना आढळतात; पण त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचे खरे स्वरूप जाणून अर्जुन त्यांच्याशी एखाद्या भक्ताप्रमाणे व्यवहार करू लागतो. श्री ज्ञानेश्वर महाराज अर्जुनासाठी ‘सख्यभक्तीची मातृका’ असा शब्दप्रयोग करतात. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला, पर्यायाने सर्वच पांडवांना वेळोवेळी सांभाळले. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये ‘दासा साह्य नारायण, होय रक्षिता आपण’ असे म्हटले आहे. त्याचे दर्शन भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या कथांमधून होते. यातीलच काही कथा आपण पाहणार आहोत.
कौरवांच्या नामवंत सरदारांनी अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये घेरले, त्या वेळी जयद्रथाने इतर पांडव सरदारांना चक्रव्यूहाच्या तोंडाशी अडवले. पर्यायाने त्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू मारला गेला. आपल्या मुलाला सर्वांनी एकत्र येऊन मारले आणि आपण त्या वेळी अभिमन्यूला मदत करू शकलो नाही, याचे अर्जुनाला खूप दुःख झाले. ‘उद्या संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत मी जयद्रथाला मारीन; पण माझ्या हातून जयद्रथ मारला गेला नाही तर मी आत्मदहन करीन‌, अर्थात स्वतःला जाळून घेईन’ अशी प्रतिज्ञा शोकसंतप्त अर्जुनाने केली. दुसऱ्या दिवशीच्या युद्धामध्ये जयद्रथ युद्धभूमीवर आलाच नाही. त्या वेळी असणाऱ्या नियमानुसार युद्धभूमीवर नसलेल्या वीरावर हल्ला करता येत नसे. पर्यायाने सूर्यास्ताची वेळ जवळ आली; पण जयद्रथ मारला गेला नव्हता. त्या वेळी भगवान श्रीकृष्णाने आपल्या लीलेने सूर्यास्त झाल्याचे चित्र उभे केले. अर्जुनाने आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे स्वतःची चिता स्वतःच सिद्ध केली आणि तो भगवंतांच्या आज्ञेनुसार आपल्या धनुष्यबाणासह त्या चितेत अग्निप्रवेश करायला सिद्ध झाला. हे सगळं दृश्य पाहण्यासाठी कौरव-पांडव सेना तिथे एकत्र झाली होती. पांडवांमधील महापराक्रमी योद्धा कोणताही प्रयत्न न करता स्वतःला संपवत आहे, याचा कौरवांना खूप आनंद झाला होता. ह्याला मीच कारणीभूत आहे हे जाणून जयद्रथ कौरवसेनेच्या अग्रभागी डौलाने उभा राहिला. त्याला तेथे पाहताच भगवान श्रीकृष्णांनी सूर्यावरील अंधाराचे आवरण दूर केले आणि अर्जुनाला सांगितले, ‘अर्जुना, हा सूर्य हा जयद्रथ.’ अर्जुनाने धनुष्यावर बाण चढवला. त्या वेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ‘अर्जुना जयद्रथाचे मस्तक जमिनीवर पडू देऊ नको. कारण, जो कोणी आपल्या मुलाचे मस्तक जमिनीवर पाडेल त्याच्या मस्तकाची शंभर शकले व्हावीत असा वर त्याच्या वडिलांनी म्हणजे वृद्धक्षत्र राजाने मागून घेतला आहे. म्हणून हे अर्जुना, जयद्रथाचे मस्तक तुझ्या बाणांनी उडवत उडवत त्याच्या वडिलांच्या मांडीवर पडेल अशी व्यवस्था कर!’ अर्जुनाने त्याप्रमाणे जयद्रथाचे मस्तक वृद्धक्षत्राच्या मांडीवर नेऊन टाकले. आपल्या मांडीवर अचानक काय पडले म्हणून दचकून वृद्धक्षत्र उभा राहिला आणि ते मस्तक जमिनीवर पडले. त्या क्षणी वृद्धक्षत्राच्या मस्तकाचे शंभर तुकडे झाले. वाचकहो, आपल्याला वरील कथेचा पहिला भाग माहीत असतो; पण पुढील भाग ज्ञात नसतो. बरोबर ना?
अर्जुन हा सरळ मनाचा आहे. तो भावनेच्या भरात टोकाची प्रतिज्ञा करतो; पण त्यात तो स्वतःलाच अडचणीत आणतो. वरील प्रसंगी भगवान श्रीकृष्ण तेथे नसते, तर काय झाले असते? कौरवांना अर्जुनाला मारणे शक्य नव्हते. ते जर झाले असते तर…

– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)

 


ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा सहावा भाग…

महाभारत : कर्तव्यपालनाची ताकद
………….
आपण महाभारतादि सद्-ग्रंथ कसे वाचावेत? श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘संतांचे ग्रंथ हे आपल्या प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत. ग्रंथाच्या वाचनाने आपल्याला आपला दोष कळतो. आणि आपली चूक आपल्याला कळली की आपण लवकर सुधारतो. हा ग्रंथ आपल्याकरिता सांगितला आहे. तो कृतीत आणण्यासाठी आहे. ही भावना ठेवून वाचन करावे. हितकारक गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत. त्या आचरणात आणल्या नाहीत तर काय उपयोग?’
महाभारत म्हणजे केवळ कुरुकुळाचा इतिहास नाही. या ग्रंथात अनेक कथा, उपकथा आल्या आहेत. एकदा धर्मराज युधिष्ठिर आणि मार्कंडेय ऋषी यांच्या संवादात मनुष्याची कर्तव्ये आणि त्यांचे फळ यावर चर्चा सुरू होते. चर्चेदरम्यान मार्कंडेय ऋषी एक गोष्ट सांगतात. आज आपण तीच गोष्ट पाहू या.
कौशिक नावाचा एक तपस्वी, पण संतापी ब्राह्मण होता. आपल्या घरातील लोकांशी न पटल्यामुळे तो घर सोडून बाहेर पडला होता. एक दिवस रस्त्याने चालत असताना तो विश्रांतीसाठी एक झाडाखाली बसला. त्या झाडावर एक पक्षीही बसला होता. काही काळाने तो पक्षी शिटला. कर्मधर्मसंयोगाने ती विष्ठा कौशिकाच्या अंगावर पडली. त्याबरोबर कौशिकाने संतापून त्या पक्ष्याकडे पाहिले. कौशिकाच्या तपोबळामुळे तो पक्षी जळून गेला. आपले सामर्थ्य लक्षात आल्यामुळे कौशिकालाही मोठा आनंद झाला. पुढे तो एका घरासमोर भिक्षा मागण्यासाठी थांबला. त्याचे ‘ओम भवति भिक्षां देहि’ हे शब्द ऐकून घरातील स्त्रीने सांगितले, ‘जरा थांबावे. मी माझी कामे पूर्ण झाली की भिक्षा वाढते.’ कौशिक काही काळ थांबला, तरीही ती बाई बाहेर आली नाही. तेव्हा याने विचार केला, की ही बाई बाहेर आली, की तिचेही भस्म करून टाकू. इतक्यात ती बाई बाहेर आली आणि म्हणाली, ‘अरे जळून जायला मी काही पक्षी आहे का?’ आपल्या प्रवासात घडलेला प्रकार आणि आपल्या मनातील विचार या बाईला कसा कळला याचे कौशिकाला आश्चर्य वाटले.
इतक्यातच ती बाई म्हणाली, ‘मी आता घरातील ज्येष्ठांची सेवा करीत होते. म्हणून मला उशीर झाला. तुझ्या प्रवासात जे घडले ते मला कसे कळले ते तुला समजून घ्यायचे आहे ना? मग तू जनकपुरीतील धर्मव्याधाला जाऊन भेट.’ आश्चर्याचा आणखी एक धक्का पचवून तो ब्राह्मण जनकपुरीतील धर्मव्याधाला भेटण्यासाठी त्याच्या दुकानासमोर आला. धर्मव्याधाने त्याला बघितले आणि तो म्हणाला, ‘तुम्हाला पिंपळाजवळील घरातील बाईंनी पाठवले ना? बसा थोडा वेळ.’ आपण काही बोलायच्या आधीच आपल्याला कोणी पाठवले, हे धर्मव्याधाला कोणी सांगितले, असा विचार करत कौशिक दुकानासमोर बसून राहिला. धर्मव्याधाचा मांसविक्रीचा व्यवसाय होता. आपले काम पूर्ण झाल्यानंतर तो कौशिकाजवळ आला आणि म्हणाला, ‘मी काय किंवा ती बाई काय, आम्ही निरपेक्ष भावनेने कर्तव्यपालन करतो. आमच्या आई-वडिलांची सेवा करतो. त्याचेच फळ म्हणून आम्हाला कोणी काही न सांगताच त्यांच्या मनातील विचार कळतात, घडलेल्या घटना समजतात.’ तो पुढे म्हणाला, ‘कौशिका, तू घरच्यांशी भांडून, आई-वडिलांना सोडून आलास. आता परत घरी जा आणि पुत्राचे कर्तव्य पूर्ण कर.’ वाचकहो, आजच्या काळात हा उपदेश किती महत्त्वाचा आहे ना? आपण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा गजर करतो; पण पुंडलिकाने आपल्या आई-वडिलांच्या सेवेपुढे सर्व गोष्टी तुच्छ मानल्या हे विसरतो.
कीर्तनसंध्येच्या निमित्ताने आपण आपल्या आचरणात सुधारणा करण्याचा निर्धार करू या आणि त्यासाठी प्रयत्नशील होऊ या.

– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)


ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचितगोष्टी’ या लेखमालेचा हा पाचवा भाग…

सप्त चिरंजीव आणि महाभारत

…..

आपल्या संस्कृतीत सात जण चिरंजीव आहेत असे सांगितले आहे. हे सप्तचिरंजीव म्हणजे सात वृत्तीची व्यक्तिमत्त्वे आहेत. जसे शस्त्र आणि शास्त्रयावर प्रावीण्य मिळवलेले परशुराम सर्व पृथ्वी जिंकतात; पण निर्मोहीवृत्तीने इदं न मम म्हणत ती कश्यपांना दान देतात आणि स्वतःसाठीअपरान्त अर्थात कोकण भूमीची निर्मिती करतात. शून्यातून पुनर्निर्माण हीवृत्ती आजही अस्तित्वात आहे म्हणून परशुराम चिरंजीव आहेत. सत्याचीबाजू घेताना वेळ पडली तर आपल्या नातेवाईकांशी लढण्याची बिभीषणवृत्ती आजही कायम आहे. आपल्या अफाट बुद्धिसामर्थ्याने विश्वातील सर्वविषय स्वतः समजून घेऊन ते इतरांना समजाविण्याची व्यासवृत्ती असणारेबुद्धिमंत आजही आढळतातच ना! स्थलकाल मर्यादेमुळे हे विचारसूत्रआपणच पुढे न्यावे अशी वाचकांनाही विनंती करून मी महाभारताकडेवळतो.

 

या सप्त चिरंजीवांपैकी बली आणि बिभीषण सोडून उरलेल्या पाच जणांनीमहाभारतात सहभाग घेतला होता असे दिसते. महर्षी व्यास यांनीकुरुकुळाचे वंशसातत्य टिकवण्यासाठी कार्य केले. महाभारताचे लेखनकेले. अश्वत्थामा, कृपाचार्य हे तर यात प्रत्यक्ष सहभागीच होते. भगवानपरशुरामांनी भीष्म, द्रोण, कर्ण यांना विद्या दिली होती. श्रीमारुतीरायांचाही उल्लेख महाभारतात आला आहे. पांडवांमधील भीम हामहासामर्थ्यसंपन्न वीर होता. (डॉ. प. वि. वर्तक यांच्या मते भीम हाचमहाभारताचा खरा नायक आहे.)

एकदा भीमाला आपल्या बाहुबलाचा गर्व झाला. आपल्याइतका बलदंडकोणीच नाही असा विचार करीत तो जंगलातून चालला होता. वाटेत एकवृद्ध वानर आपली शेपटी लांब पसरून बसले आहे असे त्याने पाहिले. त्याने त्या वानराला आपली शेपूट आवरून घे अशी आज्ञा केली. त्या वृद्धवानराने आपण अतिअशक्त आहोत तरी आपली शेपूट तूच बाजूला सारूनपुढे जा असे सांगितले. स्वतःच्या बाहुबलावर विश्वास ठेवून भीमाने तेपुच्छ हटवण्याचा अनेकदा प्रयत्न केला; पण व्यर्थ! अखेर भीम त्याकपिश्रेष्ठाला शरण गेला. हे कपिश्रेष्ठ म्हणजेच श्री महारुद्र हनुमान.

 

बाणांचा पूल मोडून श्री मारुतीरायांनी अर्जुनाचा सर्वश्रेष्ठ धनुर्धरअसल्याचा अभिमानही मोडून काढला होता. त्या वेळी भगवान श्रीकृष्णांनाअर्जुनासाठी धावून यावे लागले होते. याच प्रसंगी श्री मारुतीरायांनीमहाभारत युद्धात अर्जुनाच्या ध्वजावर बसण्यास मान्यता दिली होती. यामुळेच ज्याच्या रथावरील ध्वजस्तंभावर हनुमंत आहेत त्या अर्जुनालाकपिध्वज हे नाम प्राप्त झाले आहे. ज्या भक्तश्रेष्ठ मारुतीरायांनी रामायणकाळात मोठा पराक्रम गाजवला; पण ‘हे मी केले’ असे कधीच म्हटलेनाही. त्यांना भक्तांमध्ये निर्माण झालेला अहं कसा बरे रुचावा? मी न कर्ताअशी भावना ज्यांच्या मनी आहे त्यांचा वार कोणता हे सांगताना ‘नकर्त्याचा वार शनिवार’ असे म्हटले जात असेल का? भक्ताने अहंकारशून्यअसावे, ही हनुमान वृत्ती आजही खऱ्या सद्भक्तांच्या ठायी आढळते, हेचहनुमंतांचे चिरंजीवित्व म्हणता येईल का? हा भाव आपल्या ठायी आलातरच भक्तिपंथावरून आपला प्रवास सुरू होईल. म्हणूनच,

शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता ।

काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या बा सुभटा ।

तुका म्हणे रुद्रा अंजनीचिया कुमरा ।


…….
ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा चौथा भाग…

महाभारत… गुरू द्रोणाचार्य
…..
कौरव पांडवांचे गुरू असणारे द्रोणाचार्य हे भरद्वाज ऋषींचे पुत्र होत. म्हणून त्यांना भारद्वाज द्रोणाचार्य असेही म्हणतात. पांचाल देशाचा राजा पृषत आणि द्रोणाचार्यांचे वडील भरद्वाज हे दोघे मित्र होते. राजाच्या सांगण्याप्रमाणे भरद्वाजाने आपला मुलगा द्रोण याला राजपुत्र द्रुपदाच्या बरोबर शिक्षणासाठी पाठवले. आपल्या वडिलांप्रमाणेच द्रोण आणि द्रुपद यांचीही घनिष्ठ मैत्री झाली. दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. एकाला दुःख झाले तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येत असे. एक दिवस द्रुपदाने सांगितले, की ‘मोठेपणी मला राज्य मिळाले, की मी तुला त्यातील अर्धे राज्य देईन.’ यथावकाश शिक्षण पूर्ण करून द्रुपद आणि द्रोण आपापल्या घरी गेले. द्रुपद पांचाल देशाचा राजा झाला, तर द्रोण हा अध्ययन-अध्यापनामध्ये आपले जीवन व्यतीत करू लागला. पुढे द्रोणाचार्यांचे लग्न कृपाचार्यांची बहीण कृपी हिच्याशी झाले. त्यांना अश्वत्थामा हा मुलगा झाला. परिस्थिती चांगली नसल्यामुळे कृपी पाण्यामध्ये पीठ मिसळून तेच दूध आहे असे सांगून अश्वत्थाम्याला प्यायला देत असे. अज्ञानापोटी अश्वत्थामाही ते दूध म्हणून प्राशन करत असे. एक दिवस अश्वत्थाम्याला खरे दूध प्यायला मिळाले. ती चव लक्षात आल्यावर त्याने आपल्या घरचे दूध पिण्यास नकार दिला आणि खरे दूध हवे म्हणून हट्ट धरला. आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी द्रोणाचार्य आपला बालमित्र दृपद याच्या दरबारात गेले आणि मित्राकडे गाईसाठी याचना केली. बालपणी अर्धे राज्य द्यायला तयार असणाऱ्या द्रुपद राजाने आता मात्र द्रोणाचार्यांची अवहेलना केली. त्यांना अपमानित करून रिक्त हस्ते दरबारातून बाहेर काढले. हातात सत्ता आणि संपत्ती आली, की माणसे नातेवाईक, मित्र यांना कसे विसरतात याचेच दर्शन इथे घडते.

‘मित्राकडून झालेल्या या अपमानाचा मी बदला घेईन,’ अशी प्रतिज्ञा द्रोणाचार्यांनी केली. पुढे त्यांनी भगवान परशुरामांकडून शस्त्रविद्या ग्रहण केली, अग्निवेशाकडून ब्रह्मास्त्र प्राप्त केले आणि ते हस्तिनापूरला आले. हस्तिनापूरला दुर्योधनासह इतर कौरव आणि युधिष्ठिरासह अन्य पांडवांचा विटी-दांडूचा खेळ रंगात आला होता. त्या खेळात विटी एका खोल विहिरीत पडली. अनेक प्रयत्न करूनही मुलांना ती विटी बाहेर काढता येईना. त्याच वेळी द्रोणाचार्य तिथे पोहोचले. त्यांनी ऐषिक अस्त्राचा उपयोग करून ती विटी बाहेर काढली. ही गोष्ट मुलांनी घरच्या वडीलधाऱ्या मंडळींना सांगितली. मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकाची आवश्यकता होतीच. त्यामुळे द्रोणाचार्यांकडे असलेल्या अस्त्रविद्या प्रावीण्‍यामुळे त्यांना राजपुत्रांना शिकवण्याचे काम मिळाले. पुढे या मुलांना त्यांनी उत्तम शिक्षण दिले. आपल्याला आम्ही कोणती गुरुदक्षिणा द्यावी, असा प्रश्न मुलांनी विचारला. गुरू द्रोणाचार्यांनी त्यांना ‘द्रुपदाचा पराभव करून त्याला माझ्यासमोर हजर करा हीच माझी गुरुदक्षिणा’ असे सांगितले. कुरुकुळातील या युवा वीरांनी पांचाल देशाचा राजा द्रुपद याला हरवून त्याला द्रोणाचार्यांसमोर हजर केले. अशा प्रकारे द्रोणाचार्यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. आपला हा झालेला अपमान धुऊन काढण्यासाठी द्रुपदाने यज्ञ उपासना केली. उपासनेचे फळ म्हणून की काय त्याला धृष्टद्युम्न आणि द्रौपदी अशी दोन अपत्ये झाली. द्रौपदी ही अग्नीसारखीच तेजस्वी होती. तिला पांचाली असेही एक नाव आहे. महाभारत युद्धात याच धृष्टद्युम्नाने द्रोणाचार्यांना मारले. गुरू द्रोणाचार्य आणि अश्वत्थामा उत्तम ज्ञानी होते; पण ते अधर्माच्या बाजूने लढत राहिले. हा दैवदुर्विलासच नव्हे काय? महाभारतातील कृप आणि द्रोण ह्या व्यक्तिरेखा विद्वान व्यक्तीदेखील स्वार्थापायी किती लाचार आयुष्य जगतात याचेच दर्शक आहेत.


…….
ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा तिसरा भाग…
…….
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् ।
देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ।।

महर्षी व्यासांनी वरील श्लोकाच्या उच्चारणाने महाभारत कथनाला प्रारंभ केला. या महाभारतामध्ये भीष्म, द्रोण, कर्ण इत्यादी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आल्या आहेत. त्यांना हा जन्म का प्राप्त झाला याबद्दलच्या कथाही महर्षी व्यासांनी कथन केल्या आहेत. उदाहरणार्थ गंगापुत्र भीष्म यांची पूर्वजन्म कथा. यातील एक अत्यंत महत्त्वाची धर्मनिष्ठ, न्यायप्रिय, परमज्ञानी अशी व्यक्तिरेखा म्हणजे विदुर! विदुर हा दासीपुत्र आहे. धृतराष्ट्र आणि पंडू हे त्याचेच भाऊ आहेत; पण विदुराचा स्वभाव आपल्या भावांपेक्षा खूप वेगळा आहे. तो अत्यंत सद्गुणी आणि खराखुरा तपस्वी आहे. विदुरामध्ये असलेले हे सर्व सद्गुण त्याच्या पूर्वजन्माचे निदर्शक आहेत. आजच्या लेखात आपण विदुराचा पूर्वजन्म समजून घेणार आहोत.

हस्तिनापूरच्या पूर्वेला एका अरण्यामध्ये मांडव्य नावाचे ऋषी होते. हे थोर ऋषी नेहमीच आपल्या तपश्चर्येत मग्न असत. एकदा ते ध्यानमग्न अवस्थेत असताना काही चोर त्यांच्या आश्रमामध्ये आले. या चोरांनी राजवाड्यात चोरी केली होती आणि राजाचे सैनिक त्या चोरांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग करत होते. आता आपण पकडले जाणार याची कल्पना आल्यानंतर चोरांनी सर्व मुद्देमाल मांडव्य ऋषींच्या आश्रमात टाकला आणि ते निसटले. त्यांच्या मागोमाग आलेल्या सैनिकांना तो मुद्देमाल मिळाला आणि त्यांना असे वाटले, की राजवाड्यात चोरी करून आलेला चोर ध्यान करण्याचं ढोंग करत बसला आहे. म्हणून त्यांनी मांडव्य ऋषींना पकडले आणि राजासमोर हजर केले. राजाने मांडव्य ऋषींना चोरीच्या आरोपाखाली सुळावर देण्याची आज्ञा केली. या कथेवरूनच मराठीमध्ये ‘चोर सोडून संन्याशाला सुळी’ हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा! मांडव्य ऋषी अशा अवस्थेत असतानाही त्यांना मृत्यू आला नाही. इतक्यात खरे चोर कोण याचा शोध लागला. एका तपस्वी ऋषींना आपल्याकडून शासन झाले, याचा राजाला पश्चात्ताप झाला आणि राजाने मांडव्य ऋषींना सुळावरून खाली उतरवले. त्यांची क्षमा मागितली. मांडव्य ऋषींनी राजाला क्षमा केली; पण आपल्याला ही शिक्षा का झाली, असा प्रश्न त्यांनी यमधर्माला केला. त्यावर यमाने सांगितले, ‘तुम्ही लहानपणी एकदा छोट्या पक्ष्यांना हातातील दर्भाने टोचले होते. त्याची शिक्षा म्हणून तुम्हाला या प्रसंगात सुळावर जावे लागले.’ लहान वयामध्ये आपण पाप करतो आहोत हे त्या बालकाला कळतही नाही. म्हणून मांडव्य ऋषी म्हणाले, ‘तू मला अपराधाशिवाय शिक्षा केली आहेस. म्हणून मी तुला शाप देतो, की तुला भूतलावर जन्म घ्यावा लागेल.’ ऋषींच्या शापामुळे अंबिका राणीच्या सुनंदा नावाच्या दासीच्या पोटी जन्म घेतला तोच हा विदुर होय.

 

महाभारतामध्ये विदुराने सांगितलेली विदुरनीती खूप प्रसिद्ध आहे. युद्ध टाळण्यासाठी भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी आले, तेव्हा ते विदुराच्या घरी राहिले होते, असाही संदर्भ आढळतो. देवांनी विदुराकडील साधे अन्नही मोठ्या प्रेमाने ग्रहण केले आणि ‘देव भावाचा भुकेला’ हेच दाखवून दिले. महाभारताच्या युद्धानंतर विदुराने वानप्रस्थाश्रम स्वीकारला आणि यथावकाश देहत्याग केला. त्या वेळी युधिष्ठिर तिथे उपस्थित होता. युधिष्ठिर हाही यमधर्माचाच अंश असल्यामुळे विदुराच्या शरीरातील चैतन्य त्याच्या शरीरात प्रविष्ट झाले.


महाभारत हा भारतातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये अनेक रोचक संवाद, रोमांचक युद्धप्रसंग, विविध पौराणिक कथा आणि व्रते यांची माहिती सविस्तरपणे वाचायला मिळते. महर्षी व्यासांनी महाभारत लेखनाचे केलेले अद्भुत कार्य म्हणजे एक मोठा चमत्कारच आहे. त्यांच्या कथनाचा वेग इतका होता, की त्यांना ते लिहून घेणारा योग्य लेखनिक मिळत नव्हता. अखेर त्यांनी भगवान श्री गणरायांना प्रार्थना केली. श्री गणरायांनी ती प्रार्थना स्वीकारली; पण त्यांनी एक अट घातली. ते म्हणाले, ‘मी एक क्षणही थांबणार नाही, तुम्ही अखंड सांगत राहिले पाहिजे.’ महर्षी व्यासांनी ती अट मान्य केली आणि गणरायांना एक प्रतिअट घातली. महर्षी व्यास म्हणाले, ‘मी जे सांगेन ते समजल्याशिवाय तुम्ही लिहायचे नाही.’ श्री मंगलमूर्ती गणेशांनी ही अट मान्य केली आणि मग महर्षी व्यास हे वक्ता आणि मंगलमूर्ती गणपती हे लेखनिक महाभारत लेखनासाठी सिद्ध झाले. आपल्या लेखनामध्ये जेव्हा काही थोडे चिंतन करायचे आहे असे महर्षी व्यासांना वाटले तेव्हा त्यांनी कूट श्लोकांची रचना केली. त्या श्लोकांचा अर्थ नीट समजण्यासाठी मंगलमूर्ती गणेशांनाही किंचित थांबावे लागले. त्या विराम काळात महर्षी व्यासांनी पुढच्या लेखनाचा विचार केला. म्हणूनच महाभारताचे अभ्यासक असे सांगतात, की या ग्रंथातील काही श्लोकांचा उलगडा होत नाही! बुद्धिदात्या श्री गणेशांना आपल्या अफाट बुद्धिसामर्थ्याने थोडा वेळ का होईना, विचार करायला लावणे हे ज्या महर्षी व्यासांनी करून दाखवले, त्या महर्षी व्यासांच्याच कृपेने महाभारताची थोडीशी ओळख आपल्याला व्हावी यासाठी त्यांना मनापासून साष्टांग नमस्कार करू या. महर्षी व्यासांप्रमाणेच बुद्धिदाता श्री गणराया आणि अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कलाकामिनी असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या देवी सरस्वतींना शरण जाऊन आपण आपल्या महाभारत चिंतनाला प्रारंभ करू या.

या लेखमालेतून आपण नित्यपरिचित कथा वगळून महाभारतातील काही अपरिचित सौंदर्यस्थळे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाभारत या ग्रंथालाच जय असेही नाव आहे. या ग्रंथाला इतिहास असेही म्हटले जाते. ज्याप्रमाणे रामायणामध्ये बालकांड, अयोध्याकांड, सुंदरकांड असे विविध विभाग आहेत, त्याप्रमाणे महाभारतात जे विभाग आहेत त्यांना पर्व असे संबोधले आहे. उदाहरणार्थ, सभापर्व, अनुशासन पर्व, वनपर्व इत्यादी. या ग्रंथातून आपल्याला कुरुकुळाच्या इतिहासाबरोबरच तत्कालीन भारतातील इतर वंशांच्या इतिहासाची माहिती मिळते. महाभारताबरोबरच हरिवंश हा ग्रंथही अभ्यासावा असा संकेत आहे. त्याला महाभारताचे ‘खिल पर्व’ असे म्हणतात. या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचा भाग सविस्तरपणाने आला आहे. विशेष म्हणजे श्रीदेवी विंध्यवासिनी हिची महती आणि उपासना याबद्दलही हरिवंशामध्ये चांगली माहिती मिळते. सत्यवान सावित्रीची कथा, त्यातील यम-सावित्री संवाद हाही भाग महाभारतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आला आहे. यक्षप्रश्न, तसेच भीष्मपितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील संवादही आपल्याला चिंतनासाठी मोठे खाद्य देतो. महाभारत वाचताना भीष्म, द्रोण, कृप यांच्या स्वभावाची विविध वैशिष्ट्ये आपल्याला कळतात. श्रीमद्भगवद्गीता, तसेच या गीतेवर स्वतः भगवान श्रीकृष्णांनी केलेले भाष्य, जे अनुगीता या नावाने ओळखले जाते, त्याचप्रमाणे श्री विष्णुसहस्रनाम या तर महाभारताने दिलेल्या महत्त्वाच्या देणग्या आहेत. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर माऊलींनी महाभारताला परमार्थाची जन्मभूमी म्हटले आहे.

– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार


…….

भारतीय संस्कृतीत कपिल महामुनी, भगवान श्री दत्तात्रेय, महर्षी व्यास, भगवद् पूज्यपाद श्री आद्य शंकराचार्य यांना ज्ञानावतार म्हटले आहे. याअवतारांनी कोणत्याही असुरांना मारले नाही, तर अज्ञानाचा निरास केलाआहे.

नमस्ते भगवत् व्यास वेदशास्त्रार्थकोविद् ।

ब्रह्मविष्णुमहेशानां मूर्ते सत्यवतीसुत ।।

श्रीमद्भागवताच्या प्रारंभी वरील श्लोकाने महर्षी व्यासांना वंदन केले आहे. या श्लोकामध्ये ते भगवंत स्वरूप आहेत, वेदशास्त्राचे जाणकार आहेत, तसेच ते सत्यवतीपुत्र व्यास हे ब्रह्मा-विष्णू-महेश स्वरूप आहेत, असेम्हटले आहे. आजच्या लेखात त्यांचा अधिकार समजून घेऊ या.

महाभारताचे रचनाकार भगवान वेदव्यास हे एक लोकोत्तर महापुरुष आणिपथप्रदर्शक आचार्य होते. सर्व मानवांना ज्ञानाची प्राप्ती व्हावी, त्याज्ञानाच्या आधारे प्रत्येकाने स्वतःचे कल्याण करून घ्यावे अशी त्यांचीतळमळ होती. त्यांनी पराशर ऋषी आणि माता सत्यवतीच्या पोटी जन्मघेतला. त्यांचा वर्ण सावळा असल्यामुळे त्यांना कृष्ण हे नाव पडले. मुळामध्ये वेद हा एकच ग्रंथ होता. महर्षी व्यासांनी या ग्रंथाचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार भाग केले. हे चार वेद त्यांनीअनुक्रमे पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतू या आपल्या शिष्यांनाशिकवले. रोमहर्षण या शिष्याला इतिहास आणि पुराणे शिकविली. वेदांचे विभाजन केले म्हणून त्यांना व्यास हे नाव प्राप्त झाले. त्यांचा जन्मएका बेटावर झाला. संस्कृतमध्ये बेटाला द्वीप असे म्हणतात. यावरूनमहर्षी व्यासांना द्वैपायन असे नाव मिळाले. त्यांचे वास्तव्य बदरी अर्थातबोरीच्या वनात होते. म्हणून त्यांना बादरायण असेही म्हटले जाते. महर्षीव्यासांनी अठरा पुराणे, ब्रह्मसूत्रे, महाभारत अशी ग्रंथरचना केली आहे. महाभारताला पंचमवेद असेही म्हटले जाते. महर्षी व्यासांनी ही महाभारतकथा आपल्या शिष्यांना सांगितली. त्यांचा एक शिष्य वैशंपायन याने हीकथा राजा जन्मेजयाला सांगितली. व्यासांचा दुसरा शिष्य उग्रश्रवा याने हीकथा नैमिषारण्यातील ऋषींना सांगितली. तेव्हापासून ही कथा आजपर्यंतचालत आली आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री वेदव्यासांनीभगवान श्रीकृष्णांचे उद्गार (भगवद्गीता) शब्दबद्ध केली, हे त्यांचे मोठेउपकारच होत.

म्हणौनी व्यासांचा हा थोरु ।

विश्वासही झाला उपकारु ।।

श्रीकृष्ण उक्ती आकारु ।

ग्रंथाचा केला ।। (ज्ञानेश्वरी १८. १७०७)

व्यासांच्या विवरणाची व्याप्ती इतकी मोठी आहे, की ज्या स्थानावरूनबोलायचे आहे त्याला व्यासपीठ असे संबोधले जाते. म्हणजे वक्त्यानेव्यासांच्या गादीवर आपण उभे किंवा बसलेले आहोत याचे भान ठेवावेअशी अपेक्षा यातून व्यक्त होते. आज अकारण या व्यासपीठ शब्दाऐवजीअन्य शब्दप्रयोग केला जातो. असो.

परमज्ञानी ज्ञानावतार असणाऱ्या श्री वेदव्यासांना साष्टांग नमस्कार करूया!

सच्चिदानंद रूपाय कृष्णायाक्लिष्टकारिणे ।

नमो वेदान्तवेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे ।।

कृष्णद्वैपायनं व्यासं सर्वभूतहिते रतम् ।

वेदाब्जभास्करं वंदेशमनादिनिलयं मुनिम् ।।

 


………….

भाग : पहिला 

महाभारत हा भारतातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये अनेकरोचक संवाद, रोमांचक युद्धप्रसंग, विविध पौराणिक कथा आणि व्रतेयांची माहिती सविस्तरपणे वाचायला मिळते. महर्षी व्यासांनी महाभारतलेखनाचे केलेले अद्भुत कार्य म्हणजे एक मोठा चमत्कारच आहे. त्यांच्याकथनाचा वेग इतका होता, की त्यांना ते लिहून घेणारा योग्य लेखनिकमिळत नव्हता. अखेर त्यांनी भगवान श्री गणरायांना प्रार्थना केली. श्रीगणरायांनी ती प्रार्थना स्वीकारली; पण त्यांनी एक अट घातली. तेम्हणाले, ‘मी एक क्षणही थांबणार नाही, तुम्ही अखंड सांगत राहिलेपाहिजे.’ महर्षी व्यासांनी ती अट मान्य केली आणि गणरायांना एकप्रतिअट घातली. महर्षी व्यास म्हणाले, ‘मी जे सांगेन ते समजल्याशिवायतुम्ही लिहायचे नाही.’ श्री मंगलमूर्ती गणेशांनी ही अट मान्य केली आणिमग महर्षी व्यास हे वक्ता आणि मंगलमूर्ती गणपती हे लेखनिक महाभारतलेखनासाठी सिद्ध झाले. आपल्या लेखनामध्ये जेव्हा काही थोडे चिंतनकरायचे आहे असे महर्षी व्यासांना वाटले तेव्हा त्यांनी कूट श्लोकांचीरचना केली. त्या श्लोकांचा अर्थ नीट समजण्यासाठी मंगलमूर्तीगणेशांनाही किंचित थांबावे लागले. त्या विराम काळात महर्षी व्यासांनीपुढच्या लेखनाचा विचार केला. म्हणूनच महाभारताचे अभ्यासक असेसांगतात, की या ग्रंथातील काही श्लोकांचा उलगडा होत नाही! बुद्धिदात्याश्री गणेशांना आपल्या अफाट बुद्धिसामर्थ्याने थोडा वेळ का होईना, विचारकरायला लावणे हे ज्या महर्षी व्यासांनी करून दाखवले, त्या महर्षीव्यासांच्याच कृपेने महाभारताची थोडीशी ओळख आपल्याला व्हावीयासाठी त्यांना मनापासून साष्टांग नमस्कार करू या. महर्षीव्यासांप्रमाणेच बुद्धिदाता श्री गणराया आणि अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कलाकामिनी असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या देवी सरस्वतींनाशरण जाऊन आपण आपल्या महाभारत चिंतनाला प्रारंभ करू या.

 

या लेखमालेतून आपण नित्यपरिचित कथा वगळून महाभारतातील काहीअपरिचित सौंदर्यस्थळे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाभारत याग्रंथालाच जय असेही नाव आहे. या ग्रंथाला इतिहास असेही म्हटले जाते. ज्याप्रमाणे रामायणामध्ये बालकांड, अयोध्याकांड, सुंदरकांड असे विविधविभाग आहेत, त्याप्रमाणे महाभारतात जे विभाग आहेत त्यांना पर्व असेसंबोधले आहे. उदाहरणार्थ, सभापर्व, अनुशासन पर्व, वनपर्व इत्यादी. याग्रंथातून आपल्याला कुरुकुळाच्या इतिहासाबरोबरच तत्कालीनभारतातील इतर वंशांच्या इतिहासाची माहिती मिळते. महाभारताबरोबरचहरिवंश हा ग्रंथही अभ्यासावा असा संकेत आहे. त्याला महाभारताचे ‘खिलपर्व’ असे म्हणतात. या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचा भागसविस्तरपणाने आला आहे. विशेष म्हणजे श्रीदेवी विंध्यवासिनी हिचीमहती आणि उपासना याबद्दलही हरिवंशामध्ये चांगली माहिती मिळते. सत्यवान सावित्रीची कथा, त्यातील यम-सावित्री संवाद हाही भागमहाभारतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आला आहे. यक्षप्रश्न, तसेचभीष्मपितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील संवादही आपल्यालाचिंतनासाठी मोठे खाद्य देतो. महाभारत वाचताना भीष्म, द्रोण, कृप यांच्यास्वभावाची विविध वैशिष्ट्ये आपल्याला कळतात. श्रीमद्भगवद्गीता, तसेचया गीतेवर स्वतः भगवान श्रीकृष्णांनी केलेले भाष्य, जे अनुगीता या नावानेओळखले जाते, त्याचप्रमाणे श्री विष्णुसहस्रनाम या तर महाभारतानेदिलेल्या महत्त्वाच्या देणग्या आहेत. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर माऊलींनीमहाभारताला परमार्थाची जन्मभूमी म्हटले आहे.

 

– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार