संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी-चाळकेवाडी येथे मिलिंद धोंडू चाळके यांच्या काजू बागेत वणवा लागून यात सुमारे पंचवीस ते तीस काजूची झाडे जळून राख झाली आहेत.
मंगळवारी दुपारनंतर ही घटना घडली.
चाळके यांची घरापासून काही अंतरावर असलेल्या काजू झाडांच्या बागेतून आगीचे लोळ दिसू लागल्याने लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. बागेत गवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. बागेत सुके गवत वाढले असल्याने आगीचा भडका उडाला.
चाळके यांनी काजू कलमे लावून ते वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. ही झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. रौद्ररूप धारण केलेल्या आगीपुढे विझवणाऱ्यांची मेहनत कमी पडत होती; मात्र तरीही मागे-पुढे न पाहता पुढील होणारे नुकसान टाळण्यासाठी आगीवर नियंत्रण आणण्यात त्यांना यश आले अन्यथा आजबाजूच्या बागेलासुद्धा आगीची झळ पोचली असती. आग कशामुळे लागली, याचे कारण समजलेले नाही. या आगीत दरवर्षी पीक देणारी काजू झाडे जळून खाक झाली आहेत. याची माहिती डिंगणी पोलिसपाटील नितीन मोहिते यांनी तलाठी सोनवणे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.










