रत्नागिरी मध्यवर्ती बँकेला मिळाला बेस्ट इनोव्हेटीव्ह बँक ऑफ द इयर पुरस्कार 

 

 

रत्नागिरी : भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, दिल्ली यांचेमार्फत देशातील राज्य सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकरीता “इनजिनिअस लिडरशिप समिट आणि आयकॉनिक लिडर्स २०२४” अंतर्गत बँकेला सन २०२४ चे “बेस्ट इनोव्हेटीव्ह बँक ऑफ द इयर” या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सदर पुरस्कार वितरण सोहळा वर्सा, गोवा येथे दि. १४.१२.२०२४रोजी मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. “बेस्ट इनोव्हेटीव्ह बँक ऑफ द इयर” हा पुरस्कार भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, दिल्लीचे अध्यक्ष मा.श्री. दिलीप संघवी यांचेहस्ते व गोवा राज्याचे सहकार मंत्री, मा. श्री. सुभाष देसाई, विधानसभा सभापती श्री. रमेश तवडकर यांचे प्रमुख उपस्थितीत बँकेचे संचालक महोदय श्री.म. शं. टिळेकर, श्री. ग. क. पाटील, श्री. रा.ग. गराटे, श्री म.र. खामकर, तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय चव्हाण व सरव्यवस्थापक श्री. श्रीकृष्ण खेडेकर यांनी बँकेतर्फे स्विकारला आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळ्याला देशातील राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच सहकार क्षेत्रातील, माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ मंडळी उपस्थित होते. त्यांनी बँकींग क्षेत्रातील डिजिटल परीवर्तन, सशक्तीकरण, सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.

बँकेला आजपर्यंत महाराष्ट्र शासन व सहकार क्षेत्रातील नामांकीत संस्थामार्फत विविध १८ पुरस्कार प्राप्त झाले असून भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ दिल्ली, यांचेमार्फत १९वा पुरस्कार प्राप्त झाला आहे. दि.३१.०३.२०२४ अखेर बँकेच्या ठेवी रु.२६३६.१७ कोटी कर्जे रु.२००४.३० कोटी, बँकेचा नक्त नफा रू.३०.१३ कोटी झाल्यामुळे व ग्राहकांसाठी विविध डिजीटल सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच बँकेचे मा. अध्यक्ष, कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचे उत्कृष्ट, शिस्तबद्ध कार्यनियोजन व मार्गदर्शन यामुळे तसेच बँकेचे उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव, सर्व संचालक मंडळ सदस्य, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय चव्हाण व बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे बँकेच्या कामकाजातील योगदान यामुळे बँकेला प्राप्त झाला असून, राजकीय, बँकींग व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून बँकेचे अभिनंदन करणेत येत आहे.