दापोली l प्रतिनिधी :- दापोली तालुक्यातील जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव अंतर्गत माझी वसुंधरा ५.० या अभियानाच्या अंतर्गत वृक्ष संवर्धनार्थ जालगाव श्रीराम नगर मित्र मंडळ येथील श्रीरामनगर समाज मंदिराच्या आवारामध्ये सात वर्षाच्या कांचन वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या माध्यमातून वृक्षसंवर्धनाचा वेगळा संदेश देण्यात आला.
.. वाढदिवसानिमित्ताने कांचन वृक्षाला पर्यावरण पूरक सजावटीने सजवण्यात आले होते. तसेच सेंद्रिय खताचा केक या निमित्ताने या वृक्षवल्लीला देण्यात आला.
जालगाव सुतारकोंडच्या विद्यार्थ्यांनी सेंद्रीय खताचा केक यावेळी वृक्षाला भरवला.
या निमित्ताने वृक्षसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. तसेच अर्जुन,सुरंगी,वायकुळ,आंबा या वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
वृक्षवाढदिवसाकरिता माझी वसुंधरा समितीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे,उपसरपंच स्वप्निल भाटकर, ग्रामपंचायत सदस्य हर्षाली तांबे,सदस्य मृणाल लिंगावळे ,माझी वसुंधराचे सदस्य शिरीष देसाई,ज्येष्ठ सदस्य रमेश जोशी,सोसायटीचे माजी चेअरमन महेश साबळे , श्रीरामनगर मित्र मंडळ अध्यक्ष योगेश साटम,आंबेडकर नगर सुतार कोंड शाळा मुख्याध्यापक अनुपमा बर्वे,सहशिक्षिका तांबे ,ग्रामविकास अधिकारी सतीश साळवे,ग्रापचे कर्मचारी ,आशा सेविका आणि बहुसंख्य ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.










