शालेय स्तरावरील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत गोविंदराव निकम विद्यालय सावर्डे विजेता

 

 

चिपळूण (प्रतिनिधी)-: चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित शालेय स्तरावरील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत गोविंदराव निकम विद्यालय, सावर्डे हा संघ विजेता ठरला, तर एसपीएम परशुराम हा संघ उपविजेता ठरला. शहरातील पवन तलाव मैदान येथे ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेमध्ये चिपळूण तालुक्यातील बारा शाळांनी सहभाग घेतला होता.

 

बुधवारी सायंकाळी या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला. अंतिम सामना गोविंदराव निकम विद्यालय सावर्डे व एसपीएम यांच्यामध्ये झाला. एसपीएम संघाने 30 षटकांच्या सामन्यात 24 षटकांमध्ये 109 धावा करीत 110 धावांचे आव्हान सावर्डे संघासमोर ठेवले. सावर्डे संघाने हे आव्हान अगदी कमी षटकांमध्ये पार केले व विजेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आयुष नागले-सावर्डे, उत्कृष्ट गोलंदाज शार्दुल लकेश्री-सावर्डे, स्पर्धेत 183 धावा करणारा एसपीएमचा विनीत कातळे उत्कृष्ट फलंदाज ठरला. दहा विकेट आणि चांगल्या धावा करणारा श्लोक काणेकर हा मॅन ऑफ द सिरीज ठरला. सावर्डेचा सोहम येलगुडकर हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला. चौथ्या क्रमांकावर मेरी माता संघ, तर तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस्त ज्योती हायस्कूलचा संघ राहिला.

 

स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला माजी रणजीपटू, प्रशिक्षक गोपाळ कोळी, क्रिकेटपटू-प्रशिक्षक सचिन कोळी, राजेश केणी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, उपाध्यक्ष अनिरुध्द निकम, सचिव राजेश सुतार, सुनिल रेडीज, सदस्य सौरभ कुलकर्णी, सुयोग चव्हाण, दादा लकडे, सचिन कुलकर्णी, प्रशिक्षक लतिफ परकार, उदय काणेकर, विकास ढवन, भाऊ देवरुखकर समिना परकर आदी उपस्थित होते.

 

बक्षीस समारंभाच्या वेळी पंच गोट्या भोसले, बाबल्या गुरव, समालोचक इब्राहिम सरगुरोह, बाबल्या जाधव, साहिल कदम, सचिन कुलकर्णी, वैभव नाखरे, स्कोअरर मोरे सर, श्री. लोखंडे यांचा असोसिएशनच्यावतीने सत्कार करण्यात आला.

 

ख्रिस्त ज्योती हायस्कूलचे फादर, सावर्डे हायस्कूलचे प्रशिक्षक शिरीष जाधव, एसपीएमचे प्रशिक्षक आशिष कानडे यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार शेखर निकम, चिपळूण नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते झाले होते.

 

बक्षीस वितरणवेळी प्रमुख पाहुणे गोपाळ कोळी यांनी विद्यार्थ्यांना क्रिकेटचा मंत्र दिला. भरपूर मेहनत घ्या, कसून प्रयत्न करा, जिद्द उराशी बाळगा, प्रशिक्षकांनी सांगितलेल्या शब्दांवर चिंतन करा आणि यश मिळवा, यश मिळाल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने टिकवा, असे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन शाहीद खेरटकर यांनी केले.