‘ग्रंथदिंडी’ने दुमदुमली पालवण नगरी!

ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनचा भव्य शुभारंभ
महाराष्ट्राची लोककला आणि भारतीय संस्कृतीचे घडले दर्शन

चिपळूण (वार्ताहर ): शैक्षणिक वैभवाने नटलेली मांडकी-पालवण नगरी शुक्रवारी अक्षरशः दुमदुमली. नमन, संकासूर, ढोल-ताशा-लेझीम पथक, पारंपारिक वेशभूषा, वारकऱ्यांची विठ्ठलभक्ती, देशभक्तीपर देखावे आणि ‘कांतारा’च्या माध्यमातून निसर्गसंवर्धनाचा संदेश देणारी आकर्षक सादरीकरणे, अशा बहुरंगी वातावरणात ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६चा भव्य शुभारंभ करण्यात आला. जिवंत देखावे आणि लोककलेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत काढलेल्या ग्रंथदिंडीने संमेलनाला उत्साहाची उंची गाठून दिली.

राज्यात प्रथमच आयोजित या अनोख्या संमेलनाचे आयोजन कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आमदार शेखर निकम यांनी पालखीचे पूजन करून ग्रंथदिंडीला शुभारंभ केला.

लोककलेचा जल्लोष, संस्कृतीचे जिवंत दर्शन

पालवण चौकातून निघालेल्या ग्रंथदिंडीत तालुक्यातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक नमन मंडळे आणि विविध पारंपारिक कलाकार मोठ्या संख्येने सहभागी झाले. सती-चिंचघरी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या जोशपूर्ण लेझीम पथकाने वातावरणात चैतन्य निर्माण केले. आंबतखोल विद्यालयाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित समुहनृत्य सादर करत इतिहास जिवंत केला. याशिवाय राष्ट्रपुरुषांच्या व्यक्तिरेखा, वारकरी संप्रदायाचे दर्शन, विठ्ठल-रुक्मिणीचे देखावे, विविध राज्यांच्या वेशभूषा व लोककला, तसेच शेती व्यवस्थेचे प्रात्यक्षिक दर्शन घडवण्यात आले. ‘कांतारा’च्या वेशभूषेतून जंगल वाचविण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या या दिंडीत हजारो विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग नोंदवत संमेलनाचा प्रारंभ संस्मरणीय ठरवला.
पुस्तक प्रदर्शन आणि कवी संमेलनात रसिकांची दाद
संमेलनस्थळी ग्रामीण, कृषी व सहकार विषयक पुस्तकांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. सायंकाळी आयोजित कवी संमेलनात कोकणातील स्थानिक कवींनी सामाजिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण जीवनावर आधारित प्रभावी कविता सादर केल्या. रसिक श्रोत्यांनी प्रत्येक कवितेला उत्स्फूर्त दाद दिली.

यावेळी प्रमुख कार्यवाह डॉ. निखील चोरगे, स्वागताध्यक्ष तथा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. संजय भावे, बाबुराव बोत्रेपाटील, संजय चौधरी, अजय चव्हाण, वसंत सावंत, ज्येष्ठ कवी अरूण इंगवले, राष्ट्रपाल सावंत, धिरज वाटेकर, प्रभूनाथ उर्फ बाबा देवळेकर, विलास महाडिक, कैसर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन सोहळा
शनिवार, १४ रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित राहणार आहेत. तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, किरण सामंत, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.

ग्रामीण साहित्य, कृषी आणि सहकार या त्रिसूत्री संकल्पनेवर आधारित हे संमेलन राज्यातील साहित्यविश्वात एक नवा आदर्श निर्माण करणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पालवण नगरीत सध्या साहित्य, संस्कृती आणि परंपरेचा संगम अनुभवायला मिळत आहे.