तरुणांसह ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न
शृंगारतळी (वार्ताहर) गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कोंडवाडी येथे विहिरीत पडलेल्या मोकाट बैलाला ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात यश आले.
कोंडवाडी (सारणी) येथे शांताराम तेलगडे यांची विहीर आहे. सुमारे ३० फूट असणाऱ्या या विहिरीला १५ फुटापर्यंत पाणी आहे. या विहिरीत उनाड बैल पडला आणि अडकला. याच वेळी येथील ग्रामस्थांना विहिरीत बैल पडल्याचे समजतास तुकाराम तेलगडे, अमित तेलगडे, दशरथ तेलगडे, तेजस तेलगडे, प्रफुल्ल तेलगडे, सुजल गावडे, ओंकार खैर धावून आले. यावेळी आपल्या जीवाची परवा न करता विहिरीत उतरून बैलाच्या पोटाला मोठी दोरी बांधून दोन तासाच्या अथक प्रयत्नातून विहिरीतून बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्या या कामगिरीमुळे पाटपन्हाळे मधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.












