धाराशिव येथील शैक्षणिक सहल घेऊन आलेल्या एसटीला देवगडमध्ये भीषण अपघात; खाकशी येथील तीव्र वळणावर दुर्घटना

एसटीच्या धडकेने नळ योजनेची पाईपलाईन फुटली; चार विद्यार्थी किरकोळ जखमी

देवगड (प्रतिनिधी):
खाकशी मार्गे कुणकेश्वर कडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसला खाकशी शाळेजवळील धोकादायक वळणावर चालकाचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने गाडी डाव्या बाजूला पाच फूट खाली जाऊन नळ योजनेच्या पाईपलाईनला धडकून झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. या अपघातात एसटीचे मोठे नुकसान झाले आहे.

एसटी नळ योजनेच्या पाईपलाईनला धडकल्याने पाईपलाईन फुटून पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे देवगड-जामसंडे शहराचा पाणीपुरवठा बंद झाला. हा अपघात सायंकाळी चारच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती समजताच देवगड आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील जय हिंद विद्यालय, कसबे तडोळे या शाळेची सहल शुक्रवारी धाराशिव आगाराच्या एसटी बसने देवगडमध्ये आली होती. दुपारी मिठमुंबरी येथे जेवण करून सहल खाकशी मार्गे कुणकेश्वरकडे जाण्यासाठी रवाना झाली. मात्र, खाकशी शाळेनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालक विभीषण गायकवाड यांचा एसटीवरील ताबा सुटल्याने गाडी डाव्या बाजूला पाच फूट खाली गेली. सुदैवाने झाडेझुडपे, आंब्याची बाग आणि देवगड नळ योजनेची पाईपलाईन असल्याने एसटी थांबली.

एसटीच्या धडकेने पाईपलाईन फुटली, त्यामुळे पाणी रस्त्यावर आले. अपघाताची भीषणता एवढी होती की पाईपलाईनचे दोन तुकडे झाले आणि नळ योजनेच्या सांधणांना तडे गेले. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी, सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही. बसमध्ये चाळीस विद्यार्थी आणि चार शिक्षक असे एकूण ४४ प्रवासी होते. त्यापैकी चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली आणि सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढले. एसटी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर आणि अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थी, शिक्षक आणि चालक यांना बसमधून बाहेर काढून तात्पुरती व्यवस्था अक्षय येथील साई मंदिरात करण्यात आली.

त्यानंतर, देवगड आगार व्यवस्थापकांनी तातडीने दुसऱ्या बसची आणि चालकाची व्यवस्था करून सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सहलीसाठी पुढे रवाना केले.

सध्या पर्यटन हंगाम सुरू असून शालेय सहली मोठ्या प्रमाणात कोकणातील देवगड, मालवण या ठिकाणी येत आहेत. खाकशी येथील धोकादायक वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामुळे सहलीतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी संरक्षण गार्ड बसविणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी होत आहे. यापूर्वीही या वळणावर एसटी व अन्य वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अपघातातील चालकाने ब्रेक लागत नसल्याची माहिती आगार व्यवस्थापकांना दिली आहे. आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.