Jalgaon is the hottest in the state
जळगाव ४४.८ अंश, तर भुसावळमध्ये ४४.९ अंश तापमानाची नोंद
जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील उन्हाचा पारा २ ते ३ अंशांची घसरून ४० अंशांवर आला होता. मात्र आज गुरुवारी राज्यातील सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सोमवार (ता. ८) पासून तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी (ता. ९) तापमानाने चाळिशी पार करीत ४३.३ अंशांपर्यंत मजल मारली. बुधवारी (ता. १०) ४४.६ अंश तर आज गुरुवारी (दि. ११) ४४.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.
जळगावात आज गुरुवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.८ तापमानाची नोंद शहरातील केंद्रीय जल आयोग कार्यालयात झाली. गेल्या तीन दिवसांतच शहराचे कमाल तापमान तब्बल ४.३ अंशांनी वाढल्याचे या नोंदीतून समोर आले. पुढचे काही दिवस उष्णतेची लाट अशीच राहणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.