कोकण रेल्वेतून रत्नागिरीत आली नोरा फतेह अली

मित्राच्या लग्नात सहभागी झाली

रत्नागिरी: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने पुन्हा एकदा तिच्या हृदयस्पर्शी वागण्याने सर्वांची मने जिंकली आहे. कारण तिने तिच्या मराठमोळ्या सहकाऱ्याच्या हळदी आणि लग्नासाठी थेट कोकणातील रत्नागिरीच गाठलं.

नोराने तिच्या सोशल मीडियावर एक व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये नोराने दादर स्टेशन ते रत्नागिरी या ट्रेनच्या प्रवासाची माहिती दिली आहे. तिने आपल्या टीम मेंबरच्या लग्नाला हजेरी लावून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तसंच हे लग्नही खूप स्पेशल बनवलं. यावेळी नोराने कोणताही बडेजावपणा दाखवला नाही. यावेळी आपल्या सहकाऱ्यासोबत तिने हळदीत डान्सही केला.

नोराच्या कारकिर्दीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासूनच तिचा हा सहकारी तिच्यासोबत काम करत आहे. तिचं यश हे कॅमेऱ्याच्या मागे राहून टिपणारा हा तिचा जुना सहकारी आहे. त्यामुळे याच गोष्टीचा आदर राखत नोराने आपल्या सहकाऱ्याच्या आयुष्यतील महत्त्वाचा क्षण अधिक गोड करण्यासाठी स्वत: रत्नागिरीला हजेरी लावली. यावरूनच तिचं तिच्या टीमसोबत असलेलं बाँडिंग देखील दिसून येतं.

व्लॉगमध्ये नोरा नवऱ्या मुलाच्या कुटुंबासोबत हळदी समारंभात डान्स करतानाही दिसली. तिची उपस्थिती आणि तिचा उत्साह यामुळे या हळदी समारंभाची शान आणखीनच वाढली. जणू ती खरोखरच कुटुंबाचा एक भाग बनली होती. स्वत: नोरा गावी आल्याने तिच्या सहकाऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं पाहायला मिळालं.

नम्रता आणि कृतज्ञतेचे एक सुंदर उदाहरण म्हणून चाहते नोराच्या व्यावहारिक स्वभावासाठी आणि तिच्या टीमला कुटुंबासारखे वाटण्याची क्षमता याबद्दल तिचे कौतुक करत आहेत.

नोरा तिच्या क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. यो यो हनी सिंगसोबत तिच्या ‘पायल’ म्युझिक व्हिडिओच्या प्रचंड यशानंतर तिने अलीकडेच करण औजलासोबत ‘आये हाये’ या हिट म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे.