कारवांचीवाडी येथील गौरीशंकर इमारतीच्या सी विंगमधील चार सदनिका फोडल्या

मात्र चोरटे हात हलवत परतले

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील गौरीशंकर या इमारतीच्या सी विंगमधील चार सदनिका फोडल्याची घटना मंगळवार 21 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घर फोडीत चोरट्यांच्या हाती काही न लागल्याने शहर पोलिस ठाण्यात याबाबत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

कारवांचीवाडी येथील गौरीशंकर इमारतीच्या सि विंगमधील चार बंद सदनिका फोडल्याचे बुधवारी सकाळी इमारतीतील इतर रहिवाशांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी शहर पोलिसांना खबर देताच शहर पोलिस श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. या चार सदनिकांपैकी तीन सदनिका बंदच असतात तर एका सदनिकेतील कुटूंब बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी आजूबाजूच्या सदनिकांचे दरवाजे बाहेरुन बंद करुन घेतले. त्यानंतर या बंद सदनिकांचे दरवाजे फोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आतमधील कपाटे फोडून त्यातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून मौल्यवान दागिने आणि पैशांचा शोध घेतला. परंतू चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले. काही सदनिकांमध्ये चांदीच्या देवांच्या मूर्त्या,लॅपटॉप असूनही चोरांनी त्या चोरल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरात घरफोड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांची गस्त सूरु असूनही चोरटे घरफोड्या करण्यात यशस्वी होत आहेत. घरफोडी करणारे चोरटे हे अनेकदा परप्रांतिय असल्याने त्यांचा शोध घेण्यात विलंब होतो. मंगळवारी एकाच इमारतीमधील चार सदनिका फोडल्याची घटना घडल्यामुळे पोलिस विभागासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.