रत्नागिरीत मातृवंदना योजनेचा ४,९३८ गर्भवतींना लाभ 

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४ हजार ९३८ लाभाथ्यांच्या बॅंक खात्यावर १ कोटी १७ लाख ७४ हजार रुपये अनुदान जमा झाले आहेत.

 

आरोग्य विभागातर्फे ८ डिसेंबर २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गर्भवती महिलेला एकदाच लाभ दिला जातो. हे ५ हजार रुपये तीन टप्प्यात दिले जातात. अॅपद्वारे लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा होतात. सुधारित सूचनेनुसार, या योजनेत लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग राहणार आहे. आतापर्यंत पहिले आणि दुसरे अपत्य असलेल्या ४ हजार ९३८ लाभार्थ्यांच्या खात्यावर १ कोटी १७ लाख ७४ हजार रुपये अनुदान जमा झाले. ही योजना माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्यादृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, या उद्देशाने सुरू केली आहे.

जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल मृत्यूदरात घट होऊन तो नियंत्रणात राहावा, लाभ हा जन्मावेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूण हत्येस अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरणार आहे. लाभार्थ्यांकडून आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वृद्धिंगत करणे, अर्भकाच्या जन्माबरोबरच जन्म नोंदणीच्या प्रमाणात वाढ व्हावी, असे प्रयत्न केले जात आहेत.

 

तालुकानिहाय शहरी व ग्रामीण भागातील लाभार्थी

*तालुका* ग्रामीण* शहरी

* मंडणगड* १७३* ०

* दापोली* ३२७* ३५

* खेड* ५१३* ३९

* गुहागर* ३१५* ०

* चिपळूण* ७४७* १२०

* संगमेश्वर* ४६३* ०

* रत्नागिरी* १२५२* २६६

* लांजा* ३९०* ०

* राजापूर* २९७* ०