संचालक क्रिस्पीनो सिक्वेरा यांचे केले कौतुक
बांदा : प्रवीण परब
माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी बुधवारी निगुडे येथील सिक्वेरा डेअरी अँड फार्म या संस्थेला भेट देत पाहणी केली. गोशाळा, सेंद्रीय शेती व बागायती, कुक्कुटपालन, शेळीपालन आणि शेती पूरक व्यवसायांचे त्यांनी कौतुक केले. सिक्वेरा डेअरी अँड फार्मचे संचालक क्रिस्पीनो सिक्वेरा यांनी खा. नारायण राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी संचालक क्रिस्पीनो सिक्वेरा यांनी विविध उपक्रमांची खा. नारायण राणे यांना विस्तृतपणे माहिती दिली. गोशाळेत १०० गायी असून दररोज सुमारे १५० लीटर दूध संकलन करण्यात येते. तसेच दुधापासून तूप, लोणी, पनीर यासह विविध दुग्धजन्य पदार्थ बनविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय कुक्कुटपालन, शेळी पालन, सेंद्रीय भाजीपाला, फळबागायती करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी खा. राणे यांनी सर्व उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून संचालक सिक्वेरा यांचे कौतुक केले. त्यांनी परदेशातील डेअरी अँड फार्म विषयी माहिती देत व्यवसायिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला. यावेळी डॉ. मिलींद कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी डेअरी अँड फार्म चे संचालक क्रिस्पीनो सिक्वेरा, डॉ. विठ्ठल डुंडगे, सुशांत खानोलकर, सचिन घाडी, शिवानंद राऊळ, महिंद्र कोटला, राजन पाटील, राकेश चव्हाण, तुकाराम मोरजकर उपस्थित होते.











