मराठमोळ्या बोलीभाषा संस्कृतीचा वारसा जपणारा कार्यक्रम म्हणजेच “मराठी बाणा”

मराठी लोककला नेली सातासमुद्रापार वाशिष्ठी कृषी प्रदर्शनातील सादरीकरणाला चिपळूणकरांचा उदंड प्रतिसाद

चिपळूण (संतोष सावर्डेकर):– ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ..आमची अस्मिता मराठी..अमुचा स्वाभिमान मराठी..आमची संस्कृती, आमची बोलीभाषा आणि आमची माय बोली मराठी’. याच मायबोली मराठी संस्कृतीचा बाज मनोरंजनातून भारतात आणि सातासमुद्राच्या पलीकडे मांडताना सांस्कृतिक कलेचा पताका फडकविणारा कार्यक्रम म्हणजे “मराठी बाणा”होय. याच मराठमोळी संस्कृती दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमाला चिपळूणवासीयांनी मंगळवारी रात्री वाशिष्ठी डेअरी आयोजित ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला.

वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी प्रदर्शन आणि पशुधन संवर्धन महोत्सवामध्ये मंगळवारी रात्री आठ वाजता अशोक हांडे निर्मित आणि दिग्दर्शित केलेला ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाचे आयोजन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चिपळूणकरांनी तोबा गर्दी केली होती.

मराठमोळ्या या कार्यक्रमाची सुरुवातच अशोक हांडे यांनी भूपाळी सादर करत केली. त्यानंतर सर्वांनाच पंढरीच्या विठुरायाचे दर्शन या कार्यक्रमातून झाले. हरिनामाचा गजर करत वारकऱ्यांची दिंडी जेव्हा रंगमंचावर आली तेव्हा क्षणभर आपण पंढरपुरात तर नाही ना असा भास रसिकांना झाला. यानंतर ग्रामीण भागातील जीवन शैली मध्ये शेती आणि शेतकरी याला महत्व आहे. या शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनावरती सादरीकरण ‘झुंजू मुंजू पहाट झाली.’ या गीताने करण्यात आले. आदिवासी आणि त्यांचे जीवन यावर कलेतून प्रकाश टाकताना भलरी दादा भलं.. झुंबरान मांडल र..झुंबरान मांडल, आम्ही ठाकर ठाकर.. या गीताने अक्षरशः रसिकांना वेड लावले. त्यानंतर या मायबोलीचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांमध्ये दर्याचा राजा असणारा कोळी समाज आणि त्यांची बोलीभाषा संस्कृती जपणारा कोळी नृत्य प्रकार सुद्धा या कार्यक्रमातून दाखवण्यात आला. वेसावकर आणि मंडळी यांची गाणी मराठी बाणा कार्यक्रमातून नृत्य आविष्कार पाहताना मन ओथंबून आले. अनेक गीताचे सादरीकरण पाहताना रसिक मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने आपल्या लोककला आणि लोक नृत्य यांची नव्या पिढीला माहिती मिळत होती. कार्यक्रमात गवळण दाखवताना “नेसली ग बाई चंद्रकला टिपक्याची” ही गवळण ऐकताना सुद्धा रसिक तल्लीन झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने समाजाला त्या काळामध्ये प्रबोधन करताना संत महात्मा यांनी काव्य संपदा लिहून ठेवली आहे. त्यापैकीच एक प्रकार म्हणजे भारुड . एकनाथांची भारूडे खरोखरच एक समाजाला बोध आणि जनजागृती करणारी कला कृती आहे. त्यापैकी एक भारुड तुला ‘बुरगुंडा होईल बया ग हे’ याचे सादरीकरण आणि त्याची बतावणी स्वतः अशोक हांडे यांनी अप्रतिम केली.

आपल्या हिंदू संस्कृतीत सणांची रेलचेल सुरू होते. त्यामधीलच पहिल्यांदा श्रावणामध्ये येणारा दहीहंडी उत्सव. या दहीहंडीची रंगत या ठिकाणी प्रत्यक्ष रंगमंचावर पाहताना “तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा…” या गीतांनी दहीहंडी उत्सव डोळ्यासमोर आला. यातील कलाकारांचे खरंच मनापासून कौतुक करा व तितकं थोड आहे. अतिशय उत्तम सादरीकरण उत्तम टाइमिंग आणि कलादिग्दर्शन या कार्यक्रमातून बघायला मिळाले.

गणेश उत्सव म्हणजे कोकणची शान आहे. हाच उत्सव प्रत्यक्ष दाखवताना त्यातील गोडवा सादरीकरणातून टिकवून ठेवला होता. गणरायाची आरती प्रत्यक्ष पाहताना उपस्थित सर्व रसिकांचे नकळत हात सुद्धा आरतीसाठी जोडले गेले. इतका मनाला भिडणारा मराठी बाणा कार्यक्रम सादर करण्यात आला.

मराठमोळी संस्कृती जपताना या कार्यक्रमातून नंतर पारंपरिक लगीन सराई दाखविण्यात आली. “या गो दांडा वरन नवरा कुणाचा येतो” या वरातीमधील गीताने व सादरीकरणाने रंगत आणली. प्रत्यक्ष वरात येणं त्या वरातीत एक दारू पिणारा व्यक्ती डुलत येणे. त्यातून निर्माण होणारी गंमत पाहताना रसिकानी हास्यकल्लोळ केला. त्या व्यक्तीने अतिशय हुबेहूब दारू पिणाऱ्याची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर प्रत्यक्ष मंगलाष्टक आणि नंतर सासरी मुलगी जाते, तेव्हा आई-वडिलांच्या जीवाची होणारी घालमेल, त्यांच्या डोळ्यांमधील अश्रू आणि त्यांची भावनिक भेट. हा प्रसंग पाहताना रसिकांच्या डोळ्यातून अश्रूनी वाट मोकळी केली. इतका हुबेहूब दर्शन घडवणारा मराठी बाणा कार्यक्रम अशोक हांडे आणि अन्य कलाकारांनी सादर केला.

कोकणातील लोककला नमन, गोंधळ, शिवकालीन सादरीकरण करताना प्रत्यक्ष शिवाजी महाराज यांचे आगमन, पोवाडा, नृत्य अशा अनेक प्रसंगांनी हा मराठी बाणा कार्यक्रम यशाच्या उंचीवर गेला. आपली पारंपारिक मराठी बोलीभाषा संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमातून सर्वांनाच घडले.

यावेळी वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी कार्यक्रमाचे संस्थापक निर्माता दिग्दर्शक अशोक हांडे यांचा सन्मान केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, अशोक दादांनी चिपळूणमध्ये येऊन हा कार्यक्रम केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत. आमच्या चिपळूणकरांना असा कार्यक्रम पहाण्याची संधी वेळोवेळी तुमच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव उपस्थित होते.

या कार्यक्रमाला माजी आ. रमेश कदम, माजी आ. डॉ विनय नातू, माजी आ. संजय कदम , नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि राजकीय व कला सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती.

चौकट-
सातासमुद्र पार कार्यक्रम केले परंतु चिपळूणकरांचे प्रेम वेगळेच – अशोक हांडे

मराठी बाणा, मंगल दंगल गाणी यांचे कार्यक्रम मी संपूर्ण महाराष्ट्र भारतात आणि परदेशात सुद्धा केले आहेत. चिपळूण मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी पहिल्यांदा मराठा बाणा कार्यक्रम केला होता. त्यावेळी सुद्धा रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. पुन्हा दहा ते बारा वर्षांनी चिपळूणमध्ये मराठी बाणा सादर करताना आनंद झाला. चिपळूणकरानी दिलेले हे प्रेम पाहून मी भारावून गेलो. साता समुद्रापलीकडे सुद्धा कार्यक्रम केले आहेत. मात्र चिपळूणचा रसिक प्रेक्षक हा वेगळाच आहे. इथले प्रेम वेगळं आहे,-इथली माणसे वेगळी आहेत, अशा शब्दात अशोक हांडे यांनी चिपळूणकरांबद्दल स्तुती सुमने उधळली. त्यांनी वाशिष्ठी डेअरी आणि कृषी महोत्सव आयोजित करणारे प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांचे मनापासून आभार मानले.