खेर्डी येथे सुवर्ण महोत्सवी वाढदिनी दरवळला प्रेम, आपुलकी अन स्नेहाचा सुगंध
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण : गौरी-गणपतीचा सण घरोघरी असतानाही आपण माझ्या प्रेमाखातर, मला आशीर्वाद देण्यासाठी इथे जमलात, हे मी माझे भाग्यच समजते. माझं कुटुंब, बालपणीच्या मित्र-मैत्रिणींसह अनेकांनी माझा जीवनप्रवास उलगडताना माझ्या कार्याचे कौतुक केले. खरंतर, तुमची शाब्बासकी हीच माझी प्रेरणा आहे, असे भावनिक उद्गार चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांनी काढले.
सोमवार दि. १ सप्टेंबर रोजी सौ. स्वप्ना यादव यांचा ५० वा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस होता. मात्र हा सोहोळा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी खेडी येथील त्यांच्या निवासस्थानी अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रेम, आपुलकी, ममता आणि स्नेहाचा सुगंध दरवळत ठेवणारा हा क्षण सौ. यादव यांच्यासोबतच चव्हाण आणि यादव कुटुंबासाठी अविस्मरणीय असाच ठरला. विशेष म्हणजे, या सोहोळ्याची पुसटशी चाहूल देखील सौ. यादव यांना लागून न देता चिपळूण नागरी पतसंस्था, वाशिष्ठी डेअरी परिवार आणि प्रशांत यादव मित्र मंडळाच्या शिलेदारांनी अतिशय नीटनेटके असे नियोजन केले होते. यामुळे हा कार्यक्रम त्यांच्यासाठी ‘सरप्राईज’ ठरला. साई आरतीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सौ. स्वप्ना यादव यांनी उपस्थितांचे आभार मानत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या मनोगतात त्यांनी आजोबा, सासूबाई यांच्या आठवर्षीना उजाळा देत आपल्या जडणघडणीत त्यांचा कसा हातभार लागला, शिस्त, स्वच्छता आणि नीटनेटकेपणाची त्यांच्याकडून मिळालेली शिकवण यावर अतिशय मोकळेपणाने भाष्य केले. डोक्यावर आई-वडिलांचा हात, प्रशांत यादव यांच्यासारख्या पतीची लाभलेली खंबीर साथ, सोनपावलांची स्वामिनी आणि तुमच्यासारखी जोडली गेलेली असंख्य जीवाभावाची माणसं यामुळे माझं आयुष्य आज सार्थकी ठरल्यासारखंच वाटते, असे सांगत त्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, चेअरमन सुभाषराव चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती सौ. स्मिता चव्हाण यांनी स्वप्ना यादव यांना वाढदिवसानिमित्त आशीर्वाद दिले. आपल्या सामाजिक कार्याचा, विचारांचा वारसा त्या पुढे नेत असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. येथील शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब मजूर यांच्यासाठी दूध डेअरी उभारण्याचे अधुरे राहिलेले स्वप्न आपल्या मुलीने पूर्ण केल्याबद्दलही समाधान मानले.
उद्योजक प्रशांत यादव यांनी शुभेच्छापर मनोगतात, स्वप्ना यादव या कुटुंबाचा ‘आधारवड’ असल्याचे आवर्जुन सांगत त्यांच्या कार्याची आणि नियोजनात्मक व्यवस्थापन कलेचे कौतुक केले. ती पत्नी म्हणून माझ्या आयुष्यात आली हे मी माझं भाग्य आणि पूण्य समजतो, चव्हाण साहेबांनी सहकारातून जे सामाजिक काम उभं केलं तो वारसा स्वप्ना यादव सक्षमपणे पुढे नेत आहेत, याचा आनंदही व्यक्त केला. लग्नानंतरचा काही वर्षातील खडतर प्रवासावर भाष्य करताना ते म्हणाले, अनेक आव्हाने, अडचणी समोर आल्या. पण तिने केव्हा मला हार मानू दिली नाही. ती खंबीरपणे माझ्या आणि यादव कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली. वेळोवेळी मला पूश, चार्ज केलं. मला ताकद दिली. माझ्या आतापर्यंतच्या वाटचालीत तिची लाभलेली समर्थ साथ नसती तर मी देखिल या टप्प्यावर आज उभा दिसलो नसतो, असे सांगत पुढच्या काळात जे तुला अपेक्षित आहे, त्या गोष्टी पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिल आणि तुमच्या भरारीसाठी मला काही करता आले तर शंभर टक्के योगदान देईन, अशी ग्वाही देखील श्री. प्रशांत यादव यांनी दिली.
या वेळी जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, बळीराम मोरे, चिपळूण नागरीचे महेश शिंदे, उद्योजक अनिल चिले, श्री. मगदूम, पत्रकार सतीश कदम, बालमैत्रिणी वृशाली जाधव, सुरंग अभ्यंकर, स्वाती खेडेकर-भोजने, जाऊबाई प्रा. तृप्ती यादव, कराड येथील अशोक माने, भाजप शहर अध्यक्ष शशीकांत मोदी, माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, विजय शिंदे, गुहागर नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, माजी समाजकल्याण सभापती मनोहर मोहिते, बहीण अॅड. नयना पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था, वाशिष्ठी डेअरीतील कर्मचारी यांनीही स्वप्ना यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना उदंड आयुष्य व निरोगी आरोग्य लाभण्यासाठी प्रार्थना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. दरम्यान, सोमवारी दिवसभरही सौ. स्वप्ना यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर सुरूच होता.













