शिरगाव हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा उत्साहात 
सन १९८६-८७ चा दहावीचा वर्ग भरला ३८ वर्षांनी !
शिरगाव ( प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूलच्या सन १९८६-८७ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी शिरगाव हायस्कूल येथे स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.या स्नेहमेळाव्यामुळे ३८ वर्षानंतर आयुष्याच्या उत्तरार्धातील मित्र- मैञिणींच्या भेटीने जुन्या आठवणी ताज्या झाल्या.बालपणीची आठवण हिच उर्वरित आयुष्यातील खरी ऊर्जा आहे!
या स्नेहमेळाव्यात प्रथम या सस्थेचे संस्थापक, अध्यक्ष कै.पुंडलिक अंबाजी कर्ले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.नंतर गुरुवयांची पाद्यपुजनाने गुरुवंदना करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती देवीचे पुजनाने करण्यात आली.यानंतर ‘खरा तो एकची धर्म..’या प्रार्थना म्हणण्यात आली.तसेच या स्नेहमेळाव्यानिमित्ताने तत्कालीन मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, तसेच विद्यमान संस्था पदाधिकारी,विद्यमान मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तत्कालीन शिक्षक अजित कोठावळे सरांनी,शिक्षकाचे स्थान हे विद्यार्थ्यांवर अवलंबून असते.आम्ही जसे तुमच्यावर संस्कार केले, तसेच शाळेने आमच्यावरही संस्कार केले आहेत.विलास ऐनापुरे सर यांनी ,मला शाळेतील दिवस व विद्यार्थी आठवले. या बॅचने आम्हाला गुरु माऊली म्हटले आम्ही धन्य झालो. विजयकुमार कदम सर यांनी, शाळेतील संस्काराच्या शिदोरीतून घडलेल्या विद्यार्थ्यांची समाजात विविध स्तरावर झालेली प्रगती हि कौतुकास्पद आहे.हि संस्था नवनवे उपक्रम राबवित आहे.शिरगाव येथे एज्युकेशन हब( शैक्षणिक केंद्र) करण्याचा या संस्थेच्या संकल्पनेला हातभार लावावा.असे मत व्यक्त केले. गौरीहर शेट्ये यानीही मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे मानद अधीक्षक संदीप साटम यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दल तसेच शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी माजी प्राचार्य विजयकुमार कदम, विलासराव ऐनापुरे,माजी शिक्षक गौरीहर शेट्ये,अजित कोठवळे,प्रपुलचंद चिंदरकर, चंद्रशेखर आचरेकर, सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक दिलीप पाळेकर,या संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, मानद अधीक्षक संदीप साटम, संस्थेचे सरचिटणीस रघुनाथ चव्हाण, स्थानिक शाळा समितीचे चेअरमन भिकाजी चौकेकर, संचालक हेमंत देसाई,सदस्य मंगेश लोके, प्राचार्य एस.एन.अत्तार, पर्यवेक्षक उदयसिंह रावराणे,पु.अ.कर्ले महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश साटम यांनी केले.तर सत्यपाल लाडगावकर यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.
या नंतर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.नंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.
बालपणीच्या आठवणीत रमून गेलेले मित्र- मैत्रिणी
नवीन ऊर्जा घेऊन घरी परतले.












