अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा उत्साहपूर्ण सोहळा

सालाबादाप्रमाणे यंदाही रविवार, ५ जानेवारी २०२५ रोजी अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष (मुंबई) या आयएसओ प्रमाणित संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीरीत्या पार पडले. राधा कृष्ण बँक्वेट, बोरीवली येथे आयोजित करण्यात आलेल्या या तृतीय वार्षिक संमेलनाला ज्योतिष क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून ज्योतिष अजिंक्य नलोले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ज्यो. अनिल महामुनी गुरुजी, ज्यो. अजय पाठक, ज्यो. सतीश नाईक या ज्योतिषाचार्यांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली. संस्थेच्या संस्थापक व संचालिका डॉ. समीक्षा दारवलिकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर तांत्रिक व इतर व्यवस्थापनाची धुरा कार्यवाह डॉ. ज्योतिष मित्र मिलिंद, डॉ. हेमंत उपासनी आणि सल्लागार श्री. दीपक पाटील यांनी सांभाळली.

 

कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि गणेश आरतीने झाली. त्यानंतर मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्ष ज्यो. अजिंक्य नलोले यांनी वास्तु दिशा आणि उपाय या विषयावर मौलिक मार्गदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर प्रमुख पाहुणे ज्यो. अनिल महामुनी यांनी वैदिक ज्योतिष शास्त्र आणि अध्यात्मिक उपाय या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

 

ज्यो. अजय पाठक यांनी ज्योतिष शास्त्र आणि गणित या विषयावरील आपले विचार मांडले, तर ज्यो. सतीश नाईक यांनी कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीवर मौलिक माहिती दिली. संस्थेचे कार्यवाह ज्योतिष मित्र मिलिंद यांनी जुळी मुले आणि कुंडली तसेच अष्टक वर्ग या विषयांवर उपस्थितांना ज्ञान दिले. या कार्यक्रमात नवोदित ज्योतिषांना त्यांचे विचार मांडण्याचीही संधी देण्यात आली.

 

या कार्यक्रमाला बडोदा, बंगलोर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईसारख्या विविध भागांतून ज्योतिष शास्त्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ. भारती खटावकर, ज्यो. प्रज्ञा तिखे, ज्यो. सरिता गंभीर, ज्यो. निर्मला बेलामकर, ज्यो. संतोष अंबवले, ज्यो. मोरेश्वर मराठे आणि ज्यो. अनंत आठल्ये यांसारख्या ज्योतिर्विदांनी कार्यक्रमात आपली हजेरी लावली.

 

दुसऱ्या सत्रात डॉ. सौ. भारती खटावकर लिखित आराधना या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समाप्तीला सर्व सहभागी ज्योतिषांना स्मृतीचिन्ह, पुस्तक, पंचांग आदी वस्तू भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

 

या सोहळ्याने ज्ञानवर्धनाबरोबरच आपुलकीची अनुभूती दिली. ज्योतिष क्षेत्रातील हा संस्मरणीय सोहळा सहभागी झालेल्यांच्या मनात कायमचा कोरला गेला.