दोडामार्ग तालुक्यात वाघाची दहशत; पाळये येथे गाईचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

​दोडामार्ग (प्रतिनिधी):
तालुक्यातील पाळये परिसरात वाघाच्या हल्ल्याचे सत्र सुरूच असून, सोमवारी दुपारी कृष्णा चंद्रकांत दळवी यांच्या तीन वर्षांच्या गाईचा वाघाने केलेल्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पाळयेसह परिसरातील गावांमध्ये प्रचंड भीती पसरली असून, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

​दुपारच्या वेळेस शेतकरी कृष्णा दळवी यांची जनावरे शेताजवळ चरत होती. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक गाईवर झडप घातली. यावेळी सोबत असलेल्या गुराख्याने प्रसंगावधान राखत आरडाओरड केली. गुराख्याचा आवाज ऐकून वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला, मात्र वाघाने गाईच्या मागील भागाचा जबडा निकामी केल्यामुळे गाईचा जागीच मृत्यू झाला.

​वनविभागाकडून पंचनामा
​घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व घटनेचा पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

​हल्ल्यांचे सत्र वाढले
​दोडामार्ग तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. तीन दिवसांपूर्वीच मुळस हेवाळे येथे मध्यरात्री गोठ्यात बांधलेल्या रेड्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले होते. सातत्याने होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

​”जनावरे चरायला नेणेही आता कठीण झाले आहे. दिवसाढवळ्या वाघ हल्ले करत असल्याने आमच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी.”
— स्थानिक शेतकरी
​
​वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेचा आणि स्वतःच्या जीनाचा प्रश्न गंभीर झाला असून, वनविभागाने या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.