नागरी समस्या सोडवण्यावर प्रशासनाचा भर
सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी शहराचा विकास आणि नागरिकांना दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी मे महिन्यात नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले या स्वतः प्रत्येक प्रभागाचा दौरा करणार आहेत. एका प्रभागासाठी एक पूर्ण दिवस देऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या जातील आणि त्या तातडीने सोडवण्यावर भर दिला जाईल, असे मत नगराध्यक्षांनी व्यक्त केले. नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आमचे मुख्य ध्येय हे शहराचा विकास करणे हेच असून, लोकांशी संवाद साधून प्रशासकीय कामात गती आणली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शहरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत माहिती देताना नगराध्यक्षांनी सांगितले की, गॅस पाईपलाईन आणि नळपाणी योजनेसाठी शहरात अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच १५ मे पर्यंत हे सर्व रस्ते सुस्थितीत आणले जातील. सालईवाडा, सर्वोदयनगर ते मच्छी मार्केट पर्यंतचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित भागातील कामे वेगाने सुरू आहेत. तसेच पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच समन्वय बैठक घेऊन पावसाळापूर्व नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मच्छी मार्केटमधील महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह तेथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले जाणार आहे.
आरोग्य सुविधेबाबत नगरपरिषदेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये नगरपरिषदेची उपलब्ध शववाहिका आता शहरवासीयांसाठी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांबाबत प्रशासन सकारात्मक असून, रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाची दुरुस्ती आणि हायमास्ट दिवे बसवण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा झाली आहे. विविध संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबतही सभेत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
शहरातील पाणी प्रश्नावर बोलताना नगराध्यक्षांनी स्पष्ट केले की, पाणी ही सर्वांची गरज असून या विषयावर कोणीही राजकारण करू नये. जुन्या पाईपलाईनमुळे पाणी पुरवठ्यात काही अडचणी येत आहेत, मात्र सर्वांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यावेळी पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर यांनी तांत्रिक माहिती देताना सांगितले की, संस्थानकालीन भिडाची पाईपलाईन उपलब्ध नसल्याने दुरुस्तीसाठी पीव्हीसी पाईपचा वापर करावा लागला आहे. मात्र, नवीन टाकली जाणारी पाईपलाईन उच्च दर्जाची असेल आणि कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ज्या ठिकाणी गढूळ किंवा कमी दाबाने पाणी येत होते, तिथे दुरुस्ती करण्यात आली असून आता शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
नुकत्याच झालेल्या वादळामुळे शहरात २२ ठिकाणी नुकसान झाले असून नगरपरिषदेची टीम परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी कार्यरत आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही नुकसानीची पाहणी केली असून जनजीवन लवकरच सुरळीत होईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. युवकांना संधी देणे ही काळाची गरज असून प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्यावर आमचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, महिला सभापती दिलीप भालेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, सुकन्या टोपले, निलम नाईक, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.











