कुत्रा आडवा आल्याने रस्त्यालगतच्या चरात घसरून स्विफ्ट कारला अपघात 

गाडीच्या दर्शनी भागाचे नुकसान : सुदैवाने प्रवासी बचावले 

सावंतवाडी । प्रतिनिधी : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना महामार्गावर अचानक कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात स्विफ्ट कार रस्त्यालगतच्या चरात घसरून पडल्याने झालेल्या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या अपघातात चालक तसेच अन्य प्रवासी बाल बाल बचावले. मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे शनिवारी पहाटे हा अपघात घडला.

मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरील झिरो पॉईंट वर सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याच ठिकाणी गोव्याच्या दिशेने जात असताना पर्यटकांच्या स्विफ्ट कारला अपघात झाला. महामार्गावरून जात असताना अचानकपणे कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याचे काम सुरू असलेल्या चरात गाडी घसरून पडली. त्या अपघातात गाडीचे फार मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणालाही कसलीही इजा झाली नाही.