दोडामार्ग-विजघर रस्ता ठरतोय ‘डोकेदुखी’; वाहतूक कोंडीत नवरदेव अडकला, अखेर पायी चालत गाठला विवाहमांडप!

​दोडामार्ग | सुहास देसाई

दोडामार्ग ते विजघर या राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सध्या ‘युद्धपातळीवर’ सुरू असल्याचे भासवले जात असले, तरी नियोजनाच्या अभावामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा आणि त्रासाचे कारण ठरत आहे. आज याच अनागोंदी कारभाराचा फटका एका नवरदेवाला बसला. तब्बल एक तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्याने, अखेर विवाहाचा मुहूर्त चुकू नये म्हणून नवरदेवाला भर उन्हात पायी चालत लग्नमांडप गाठावा लागला.

कोकणात ​सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ आहे. मात्र, पर्यायी रस्त्यांची कोणतीही सोय न करता काम सुरू केल्याने विजघर, मुळस, मेढे, पाळये आणि साटेली-भेडशी या गावांतील ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. या मार्गावर आतापर्यंत अनेक लहान-मोठे अपघात झाले असून, काहींना गंभीर दुखापत झाली आहे, तर दुर्दैवाने दोघांना आपला जीवही गमवावा लागला आहे. या मृत्यूंना जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

​प्रशासकीय दुर्लक्ष आणि निकृष्ट कामाचा आरोप

या ​रस्त्याचे काम करताना सुरक्षिततेच्या नियमांकडे कंत्राटदाराने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. दोन महिन्यांपूर्वी शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी संबंधित विभागाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. प्रशासकीय सुस्तपणामुळे कंत्राटदाराचे फावत असल्याचे चित्र दिसत आहे.

​ग्रामस्थांसमोर उभे असलेले अनुत्तरित प्रश्न
​झाडांचा अडथळा रस्ता कामात मोलाचा दगड ठरत असून ७ मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी मार्गातील जुनी झाडे हटवणे आवश्यक असताना ती अद्याप का काढली नाहीत? त्या झाडांमुळे अपघात होत आहेत.

​बाजारपेठेचे नियोजन काय?

साटेली-भेडशी आणि दोडामार्ग बाजारपेठेतून हा रस्ता नेमका कसा जाणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.

अचानक कोसळऱ्या ​पावसाळ्याची भीती निर्मणा झाली असून रस्ता खोदून ठेवल्यामुळे पावसाळ्यात या भागात मोठी चिखलफेक होऊन रस्ता पूर्णतः बंद होण्याची भीती वर्तवली जात आहे.

​”नियम धाब्यावर बसवून हे काम सुरू आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास आणि प्रवाशांची सुरक्षा न जपल्यास, ग्रामस्थ आणि विरोधक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.”

अशा इशारा जनतेतून दिला जात आहे
​या रस्ता कामामुळे होणाऱ्या त्रासामुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. नवरदेवाला पायी चालायला लावणाऱ्या या ‘विकासकामा’बाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आता तरी जागे होणार का? की आणखी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहिली जात आहे?