एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली चा राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

“माझा भारत, विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना (NSS) निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन 11 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 दरम्यान मातोश्री वृद्धाश्रम, सांगवे-भिरवंडे, कणकवली येथे करण्यात आले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. शिबिराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, व्यक्तिमत्त्व विकास, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

शिबिरातील प्रत्येक दिवसाची सुरुवात सकाळी 6 वाजता श्री. राजन मोर्ये, डॉ. तुकाराम रावराणे आणि श्रीमती साक्षी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली योगासनाने होत असे. त्यानंतर सकाळी 9:00 वाजता प्रबातफेरी सुरू होत असे. विद्यार्थी देशभक्तीपर घोषवाक्ये देत परिसर स्वच्छता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रबातफेरी काढत होते. प्रबातफेरीनंतर श्रमदानाचे आयोजन केले गेले. यात विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता, बंधारे बांधणे अशा कामांमध्ये सहभाग घेतला.
श्रमदानाच्या प्रमुख ठिकाणांमध्ये दिर्भादेवी मंदिर, अश्वत्थ नारायण प्रसन्न मंदिर, बुद्ध मंदिर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री मोहनराव मुरारी सावंत प्राथमिक आरोग्य केंद्र, मातोश्री वृद्धाश्रम परिसर, श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर आणि गावातील सार्वजनिक पाणी साठवणूक क्षेत्र यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सिंधु फूड्स अँड बेव्हरेजेस (पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर) या उत्पादन कारखान्याला भेट दिली. तिथे कारखान्याच्या कार्यपद्धती, स्वयंचलित यंत्रणा, आणि उत्पादन प्रक्रियेबद्दल माहिती मिळाली. कंपनीचे मालक दिपक हरकुलकर यांच्याशी संवाद साधून त्यांच्या व्यवसायाविषयी माहिती घेतली.
“राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम” या विषयावर आरोग्यविषयक चर्चासत्र पार पडले. या सत्राचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. मंजूळा राजन भोसले (MBBS) होत्या, तर आरोग्य सहाय्यक विलास पवार आणि आशा गटप्रवर्तक वैष्णवी ठाकूर यांनी त्यांना सहकार्य केले.

दुपारच्या सत्रात 4:00 ते 5:00 वाजेपर्यंत बौद्धिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.12 जानेवारीला सौ. अर्चिता मुंबरकर यांनी “व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर व्याख्यान दिले.13 जानेवारीला डॉ. विनय शिरोडकर यांनी “आजचे जीवन आणि उद्याचे आरोग्य” या विषयावर मार्गदर्शन केले.14 जानेवारीला प्रा. वसिम सय्यद यांनी “राष्ट्रीय सेवा योजना आणि व्यक्तिमत्त्व विकास” यावर मार्गदर्शन केले.डॉ. सुविनय दामले यांनी “आयुर्वेदिक उपचार पद्धतींचे महत्त्व” या विषयावर आपले विचार मांडले.16 जानेवारीला प्रा. डॉ. महेश साटम यांनी “अध्यात्मिकता आणि आपले ताणतणाव” या विषयावर मार्गदर्शन केले.17 जानेवारीला प्रा. तुकाराम रावराणे यांनी “वर्तमान काळातील योगाचे महत्त्व” या विषयावर व्याख्यान दिले.
विद्यार्थ्यांनी विविध गटचर्चा आणि संवाद कार्यक्रमांमध्येही सहभाग घेतला. चर्चेचे विषय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP), फोनशिवाय आयुष्य, भारतीय निवडणूक आयोग यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित होते.
विद्यार्थ्यांनी गणेश मंदिर आणि परिसरातील सामाजिक उपक्रम स्थळांना भेटी दिल्या. त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधून त्यांचे अनुभव ऐकले आणि सामाजिक मूल्यांचे महत्त्व समजून घेतले. सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करत शिबिराचे वातावरण अधिक समृद्ध केले. 17 जानेवारी 2024 रोजी समारोप सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचे कथन केले, तर प्रमुख मान्यवरांनी त्यांचे मार्गदर्शन आणि आभारप्रदर्शन केले. या शिबिराने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण केली आणि एकत्र काम करण्याचे महत्त्व पटवून दिले.

सात दिवसांच्या या शिबिराने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना दिली. महाविद्यालयाचे संस्थापक मा. खा. नारायणरावजी राणे, अध्यक्षा मा. सौ. निलम ताई राणे, उपाध्यक्ष मा. आ. निलेशजी राणे, सचिव मा. ना. नितेशजी राणे, आणि प्रा. डॉ. डी. एस. बाडकर यांच्या मार्गदर्शनामुळे शिबिर अधिक प्रभावी ठरले. शिबिराच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांनी समर्पित सहभाग नोंदवला, ज्यामुळे सामाजिक आणि नैतिक शिक्षणाचे धडे आत्मसात झाले. NSS विभागाच्या या उपक्रमामुळे सामूहिक विकासाचे महत्त्व अधोरेखित झाले.