चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण येथे नुकतेच रत्नसिंधू सायकल संमेलन पार पडले. जिल्हा संमेलनाचे हे सलग चौथे वर्ष होते. या संमेलनात मागील वर्षभरात जिल्ह्यातील सर्वात जास्त अंतर सायकलिंग करणाऱ्या मेल रायडर प्रशांत दाभोळकर यांना सायकल सम्राट, तर फीमेल रायडर डॉ. मनिषा वाघमारे यांना सायकल सम्राज्ञी या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सायकलिंग क्षेत्रामध्ये प्रशांत दाभोळकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २००, ३००, ४००, ६०० किलोमीटर एका कैलेंडरमध्ये पूर्ण केल्याबद्दल सुपर रानडोरियर- हा सायकलिंग क्षेत्रातमधील मानाचा किताब सलग दोनवेळा मिळविला. २८ डिसेंबर रोजी झालेल्या १००० किलोमीटर बीआरएम स्पर्धा अवघ्या ७३ तासांमध्ये पूर्ण केले १००० किलोमीटर स्पर्धेचे रूट पाटण ते कागल कर्नाटक बॉण्ड्री ते परत पाटण, परत पाटण ते पंढरपूर ते परत पाटण, सातारा, किकवी या गावापर्यंत ते परत पाटण असा एक हजार किलोमीटरचा प्रवास अवगत ७३ तासात पूर्ण केला.
टूर द हंड्रेड या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतामधून २८५३ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधून प्रशांत दाभोळकर यांनीदेखिल भाग घेतला होता. त्यामध्ये सलग १०० दिवस सायकलिंग करून तब्बल ६०६० किलोमीटर सायकलिंग करून २७ हजार ५६३ पॉईंट मिळून आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा मानाचा किताब पटकाविला. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम आणि देशामध्ये ७३वा क्रमांक प्राप्त केला. रोजची प्रैक्टिस म्हणून तीस ते पन्नास किलोमीटर सायकलंग करतात. पुणे येथे झालेल्या ४०० किलोमीटर बीआरएन स्पर्धेमध्ये पहिले शंभर किलोमीटरचे अंतर अवघ्या ३ तास ३७ मिनिटात पूर्ण केले होते आणि चारशे किलोमीटरची बीआरएम अवघ्या २४ तासात पूर्ण केली. आतापर्यंत प्रशांत दाभोळकर यांनी एकूण सायकलिंग तब्बल ४२५०० किलोमीटर पूर्ण केली आहे.
सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्यातर्फे राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार २०२३ हादेखिल प्रशांत दाभोळकर यांना मिळाला आहे. २०२१च्या महापुरामध्ये अडकलेल्या २७ नागरिकांना १३ फूट पाण्यातून बाहेर काढून त्यचे प्राण वाचविल्याबद्दल त्यांना एबीपी माझा या न्यूज चॅनलच्यावतीने विघ्नहर्ता पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आला. दोन्ही जिल्ह्यांमध्ये पहिला सायकल सम्राट पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले सायकलीस्ट ठरले आहेत.
तर डॉ. मनिषा वाघमारे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पहिली महिला ट्रिपल एसअर बनण्याचा मान मिळविला. तसेच एक हजार किलोमीटर अवघ्या ७५ तासात पूर्ण केले. आजपर्यंत एकूण सायकलिंग १३५०० किलोमीटर पूर्ण केले आहे.












