
रेवंडी-शेलटी येथे कालावल खाडी किनारी घटना
पाच संशयित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल : एका संशयितास पोलिसांनी घेतले ताब्यात
मालवण | प्रतिनिधी : रेवंडी खाडी किनारी वाळू कामगारांवर काही जणांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. यात जखमी अवस्थेत खाडीपात्रात पडून बेपत्ता झालेल्या एका वाळू कामगाराचा मृतदेह मंगळवारी सकाळी शेलटी खाडी किनारी सापडला. याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात तळाशील येथील दोन संशयीत तसेच अन्य अनोळखी तीन अश्या एकूण पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान यातील एका संशयित आरोपीस मालवण पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य चार जणांचा शोध सुरू आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे, रविवारी रात्री रेवंडी जेटी नजीक कालावल खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या होडीत कामगार साफसफाई करतं असताना असलेल्या पाच जण एका होडीतून त्याठिकाणी आले. कामगारांना दांड्याने व दगडाने मारहाण केली. यां दरम्यान एक कामगार पाण्यात बुडून बेपत्ता झाला. त्याचा शोध घेण्यात आला मात्र सापडून आला नाही.
सोमवारी रात्री मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कामगार मारहाण व बेपत्ता प्रकरणी फिर्यादी विकास विलास चेंदवणकर रा. रेवंडी यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार खुनाचा प्रयत्न व अन्य विविध कलमानुसार संशयित आरोपी ललित देऊलकर (वय 30), तेजस सादये (वय 26) दोन्ही रा. तोंडवळी तळाशील तसेच अन्य 3
अनोळखी इसम अश्या पाच संशयित विरोधात सोमवारी रात्री 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एक संशयित पोलिसांच्या ताब्यात
दाखल गुन्हा प्रकरणी मालवण पोलिसांनी मंगळवारी पहाटे संशयित आरोपी ललित देऊलकर याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तसेच अन्य संशयित आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरु होता.
बेपत्ता कामगारांचा मृतदेह सापडला
मारहाण दरम्यान रविवारी रात्री खाडीपात्रात पडून बेपत्ता झालेल्या हरीलाल सिंह (वय 54) रा. झारखंड यां वाळू कामगारांचा मृतदेह शेलटी येथे कालावल खाडीकिनारी मंगळवारी सकाळी सापडून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जी. माने, सुहास पांचाळ, हेमंत पेडणेकर, सुशांत पवार यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तसेच ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणला.
खुनाचा गुन्हा दाखल
संशयित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री दाखल केलेल्या गुन्ह्यात 103 कलम वाढवण्यात आले. याबाबत पुढील तपास तसेच अन्य संशयित यांचा शोध सुरू आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.










