मालवणात तहसीलदार बंगल्याच्या जागेत अतिक्रमण

मालवण | प्रतिनिधी : मालवण तहसीलदार यांच्या बंगल्याच्या जागेत अतिक्रमण करण्यात आल्याची घटना मालवण शहरात घडली. याप्रशनी तहसीलदार वर्षा झालटे यांनी मंगळवारी आक्रमक भूमीका घेतली. महसूल, पोलीस, नगरपालिका, बांधकाम आणि दारू बंदी विभाग, भूमी अभिलेख अशा सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीने मोजणी करत संबंधितांना तात्काळ अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.

दरम्यान, तहसीलदार यांनी तातडीने बांधकाम विभागाला संपूर्ण जागे भोवताली कंपाऊड वॉल उभारण्याचे निर्देश दिले. शासकीय जागेमध्ये अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, असेही तहसीलदारांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित व्यक्तीला अतिक्रमण हटविण्याची नोटीस देण्यात आलेली असून स्वतःहून अतिक्रमण हटविण्यात न आल्यास महसूल प्रशासनाकडून पुढील कार्यवाही होणार असल्याचे तहसीलदार यांनी स्पष्ट केले.

तहसीलदार यांना राहण्यासाठी बांधकाम विभागाकडून अनेक वर्षांपुर्वी एसटी स्टॅण्ड परिसरात एका बंगल्याचे बांधकाम करण्यात आले होते. सदरचे बांधकाम अर्धवट स्थितीत असल्याने ती इमारत आता पूर्णपणे खराब झालेली आहे. या बंगल्याकडे जाण्यासाठी प्रशस्त असा रस्ता नाही. तहसीलदार वर्षा झालटे यांना शासकीय जागेत अतिक्रमण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पाऊले उचलली. यावेळी मंडळ अधिकारी पिटर लोबो, तलाठी गौरव दळवी व अन्य अधिकारी उपस्थित होते.