मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांचे वाघवणे ग्रामस्थांनी आभारपत्र देत केले कौतुक
मालवण | प्रतिनिधी : कर्ली नदीपात्रातील कर्ली पुलानजीक वाघवणे गावलगत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई करणाऱ्या मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांचे वाघवणे ग्रामस्थांनी आभारपत्र देत विशेष कौतुक केले आहे.
यापूर्वी केवळ अनधिकृत वाळू विरोधात तक्रारींचा पाऊस पाडणाऱ्या वाघवणे ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिलेले आभारपत्र खऱ्या अर्थाने विशेष असे ठरले.
दिलेल्या पत्रात म्हटले आहे, आम्ही वाघवणे येथील ग्रामस्थ आपले या पत्राद्वारे मनःपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. गेली काही वर्षे कर्ली नदीपात्रातील कर्ली खाडीपुलानजीक वाघवणे गावात अवैधरित्या वाळू उपसा चालू आहे. आम्ही ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनाकडे यापूर्वी वारंवार तक्रारी अर्ज केले. परंतु त्याबाबत दखलपात्र कारवाई करण्यात आली नाही.
आपल्याकडे याबाबत तक्रार आल्यानंतर आपण यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार धडक कारवाई केली. आपण ज्या निडरपणे कारवाई करून अनधिकृत वाळू व्यवसायिकांच्या मनात जरब निर्माण करण्याचा प्रयत्न केलात तो निश्चितच कौतुकास पात्र आहे. एक महिला अधिकारी असतानासुद्धा कोणतीही सबब न सांगता अडचणींवर मात करून धडक कारवाईचा आदर्श आपण निर्माण केला आहे.
सामान्य जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारा प्रशासकिय अधिकारी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरणच आपण सादर केले आहे. आपणासारख्या कर्तव्यदक्ष वरिष्ठांचा सहवास आणि मार्गदर्शन आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहनपर ठरून त्यांचे मनोबल वाढविण्यास व नावलौकिक मिळविण्यास महत्वाची भूमिका पार पाडेल.
आपले व आपल्या सहकाऱ्यांचे आम्ही ग्रामस्थ मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. यापुढेही आपले असेच सहकार्य लाभेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्या भविष्यकालीन उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा. असे पत्रच वाघवणे ग्रामस्थ यांनी मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांना दिले आहे.












