दिंडी चालली….पंढरपूरकडे !

शिरगाव येथून माघवारी पायीदिंडीचे उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान

राजेंद्र साटम | शिरगाव : देवगड तालुक्यातील शिरगाव येथे रविवार २६ जानेवारी पहाटेपासूनच विठ्ठलनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. टाळमृदुंगाच्या निनादात, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात शिरगाव वारकरी संप्रदायाची माघवारी पायी दिंडीने शिरगाव येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान घेतले.

शिरगावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीच्या चरणी श्रीफळ अर्पूण माघवारी पायी दिंडीचा मंगलमय प्रवासाचा शुभारंभ झाला. शिरगाव बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरात झालेल्या हरिपाठ आणि आरतीने वातावरण भक्तीमय झाले.यानंतर ग्रामस्थ, वारकरी, भक्तगण आणि उपस्थित मान्यवरांनी तसेच सुहासिनींनी माऊलींना औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. हि दिंडी शिरगाव बसस्थानकाजवळ आल्यानंतर ‘दिंडी चालली..चालली….पंढरपुरा…,’ ‘हरि मुखे म्हणा….,’ यासारखे अभंग गात वारक-यांनी विठ्ठल नामाच्या जयघोषात ‘ रिंगण सोहळा’साजरा केला.विठ्ठल नामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिरसपूर्ण झाले.
या माघवारी दिंडीने शिरगाव येथील ओम गणेश मंदिर, आंबेखोल येथील शिवाजी चौक,श्री देव कापीचा चाळा, हडपिड येथील श्री गणेश मंदिर व स्वामी समर्थ मठ, कोळोशी येथील श्री विठ्ठल मंदिर अशा विविध ठिकाणी थांबून आरत्यांचा कार्यक्रम पार पडला. हि दिंडी पुढे नांदगाव येथे पोहोचल्यावर प्रमोद लोके यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दिंडीने कणकवली तालुक्यातील लोरे नं १ येथे प्रस्थान केले. शिरगाव येथून २६ जानेवारीपासून सुरू झालेली हि दिंडी ६ फेब्रुवारीला रात्री पंढरपूरला पोहचेल.
या दिंडीतील वारक-यांच्या पारंपारिक वेशभूषा या दिंडीचे खास आकर्षण ठरल्या.

चौकट:
गेल्या ६ वर्षांपासून शिरगावची माघवारी पायीदिंडी वारकरी परंपरा जपत आहे.तसेच या दिंडीमुळे समाजात सलोखा, समता, आणि परस्पर आदरभाव वृद्धिंगत होत आहे. असे या माघवारी पायी दिंडीप्रमुख ह. भ. प. सर्वोत्तम साटम यांनी यावेळी सांगितले.
फोटो कॅप्शन: शिरगाव वारकरी संप्रदायाची भक्तीमय माघवारी पायीदिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली ( छाया: कुबल फोटो , शिरगाव)