वि. मं. करुळ गावठण अ प्रशालेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
वैभववाडी | प्रतिनिधी : नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेल्या सागर चंद्रकांत पोवार या तरुणाला प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा मान विद्या मंदिर करुळ गावठण अ प्रशालेने दिला. ज्या शाळेत लहान वयात धडे गिरवले, त्या शाळेत ध्वजारोहण करण्याचा मान मिळाल्याने सागर पोवार याच्या चेह-यावर आनंद दिसत होता.
पोलीस भरती झालेला सागर पोवार हा करुळ गावचा सुपुत्र आहे. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. शालेय वयातच सागरने पोलीस होण्याचे ध्येय बाळगले होते. रायगड जिल्ह्यात तो पोलीस भरतीत उतरला. मिरिट मध्ये पास झालेल्या सागरला आठ दिवसांपूर्वी आनंदाची बातमी कानी पडली. लवकरच तो प्रशिक्षणासाठी जाणार आहे.
प्रजासत्ताक दिनी विद्या मंदिर करुळ गावठण अ शाळा व्यवस्थापन समिती, पालक व शिक्षकांनी शासकीय सेवेत दाखल झालेल्या सागरच्या हाती झेंड्याची दोरी दिली. सागर पोवार च्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. सागरने मेहनत घेत यश संपादन केले आहे. सागरच्या उज्ज्वल यशाची प्रेरणा इतर तरुणांनी घेतली पाहिजे असे या वेळी उद्गार ग्रामस्थांनी काढले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साची कोलते, मुख्याध्यापक विकास नर, अंगणवाडी सेविका दिपीका पवार, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.











