वेंगुर्ले l प्रतिनिधी :स्वतःचे कामकाज बाजूला ठेऊन तातडीच्यावेळी रूग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणा-या सिधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १३३ रक्तदात्यांचा ऑल कॉल रक्तदाते संस्था, सिधुदुर्गच्यावतीने २६ जानेवारी रोजी सन्मान करण्यात आला. या सन्मानामध्ये वेंगुर्ला शहरातील दोन युवकांचा समावेश आहे.
जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून सिधुदुर्गामध्ये ऑन कॉल रक्तदाते या संस्थेची १४ जून २०२४ रोजी स्थापना करण्यात आली आहे. तातडीच्यावेळी रूग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे, मित्र संस्थांना सहकार्य करणे, अति तातडीच्यावेळी रक्ताची गरज भागविणा-या रक्तदात्यांना विमा संरक्षण देणे आणि रक्तदान विषयक जनजागृती करण्याचे काम ऑन कॉल रक्तदाते ही संस्था करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून अति ताडतीच्यावेळी रक्ताची गरज असताना मोटरसायकल घेऊन ऊन-पावसाची तमा न बाळगात बरेच युवक रक्तदान करून गरजू रूग्णांचे प्राण वाचवित आहेत. त्यांच्या या कार्याचा आढावा घेऊन ऑन कॉल रक्तदाते संस्थेतर्फे अति तातडीच्यावेळी रक्तदान करून रूग्णांचे प्राण वाचविणा-या सिधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १३३ रक्तदात्यांचा गोवा-बांबुळी येथील सार्थक फाऊंडेशनचे संयोजक सुदेश नार्वेकर आणि सावंतवाडी येथील युवराज लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम प्रजासत्ताकदिनी सावंतवाडीच्या रविद्र मंगल कार्यालयात संपन्न झाला. या सन्मानामध्ये वेंगुर्ला-राऊळवाडा येथील जबरदस्त मित्रमंडळाचे सदस्य हर्षद रेडकर आणि पाटीलवाडा येथील रहिवासी हर्षल परब या दोन रक्तदात्यांचा समावेश आहे.
या सन्मान सोहळ्याप्रसंगी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस, उपाध्यक्ष मीनल सावंत, सचिव बाबली गवंडे, सदस्य नाना राऊळ यांसह संस्थेचे अन्य सदस्य उपस्थित होते.












