करुळ येथे १ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

वैभववाडी | प्रतिनिधी : नवसाला पावणाऱ्या करुळ भोयडेवाडी येथील श्री. गजराजेश्वर मंदिरात शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रामेश्वर युवा मित्र मंडळ करुळ भोयडेवाडी यांच्यावतीने हा उत्सव संपन्न होणार आहे.

या निमित्त शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वा. अभिषेक, सकाळी ८ वा. महाआरती, सकाळी ९ वा. पालखी मिरवणूक, सकाळी ९.३० वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, दुपारी ३ पासून रात्री ८ पर्यंत सुस्वर भजने, रात्री ८:३० महाआरती, रात्री ९ वा. स्त्री पात्रांनी नटलेले बहुरंगी नमन हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
ओमकार चाळ मित्र मंडळ दिवा ठाणे निर्मित स्त्री पात्रांनी नटलेले लोकप्रिय कोकणचे चाळे बहुरंगी नमन तालुक्यात पहिल्यांदाच पार पाडणार आहे. संगीतमय गण, शृंगारिक गौळण, राधा कृष्णाची प्रेमलीला सोबत पेंद्या सुदामाची विनोदी धमाल आणि तुफान खळखळून हसवणारे विनोदी वगनाट्य शिपायांची कमाल राजाची धमाल हे देखील सादर होणार आहे. या उत्सवाला जिल्ह्यातील, तालुक्यातील व परिसरातील मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी, महिला व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रामेश्वर युवा मित्र मंडळ भोयडेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.