कवी तोलतो आकाश उतू जाते
– ‘फुटाणें’चे कुटाणे, नायगावकरांचे ‘फटकारे’ अन् बागवेंचे ‘ शाल जोडीतले’..
– निमित्त ‘सतीश पाटणकर’ लिखीत पुस्तक प्रकाशनाचे…
सावंतवाडी । सचिन रेडकर : कवी बोलतो धरती ऋतू होते, कवी तोलतो आकाश उतू जाते,
कवी जेव्हा बोलतो ना फुलांबद्दल फुल होऊन, ऐकायचं असतं आपण त्याच्या कडेवरचं मूल होऊन .. जेष्ठ कवी व गीतकार प्रा.अशोक बागवे यांच्या या काव्यपंक्तींनी सुरू झालेली काव्य मैफिल उत्तरोत्तर बहरत गेली. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचे राजकीय मूल्यावरील थेट प्रहार व सामाजिक संवेदनांवर आपल्या विनोदी शैलीने टाकलेला प्रकाशझोत यातच ज्येष्ठ कवी निवेदक सुधीर चित्ते यांनी शब्दांच्या कोटी करीत केलेले निवेदन यातून हलक्या फुलक्या उर्धे स्पर्शी कवितांच्या काव्यमैफिलीने उपस्थित रसिकांना पोट धरून हसवित खिळवून ठेवले. निमित्त होते ते सिंधुदुर्गचे सुपुत्र, स्तंभलेखक तथा मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर लिखित ‘जाऊ तिथे खाऊ ‘ व ‘कोकणचे आयकॉन ‘ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचे…
पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ कवींची ही काव्य संवाद मैफल चांगलीच रंगली. प्रा. अशोक बागवे यांनी आपल्या काव्यपंक्तींनी रेखाटलेल्या या मैफिलीवर अशोक नायगावकरांचे फटकारे व रामदास फुटाणे यांच्या कुटाण्यांनी चांगलीच रंगत आणत मैफिल उत्तरोत्तर सजत गेली.
सद्यस्थितीतील राजकारणावर प्रकाशझोत टाकताना रामदास फुटाणे म्हणाले, ”आमदार निवासात काही डोळे जागत होते, पिंडाला कावळा शिवण्यासाठी लाल दिवा मागत होते.” ४० वर्षांपूर्वी आमदार निवासात तिकिटासाठी जमायचे. काहींना मंत्रीपदाची अपेक्षा असायची. आजची परिस्थिती बघता पालकमंत्री पदासाठी काहीजण धडपडत आहे. मराठवाड्यात मोतूर हा शब्द आहे. ”धड नांदता येईना, डोरल बांधता येईना, मोतराचे असल्याने पोराला ‘पालक’ सांगता येईना” हीच अवस्था आहे.
सध्या साहित्यिकांच्या कार्यक्रमांना गर्दी होत नाही. महाराष्ट्रातील अनेकांना वाटणाऱ्या गोष्टींत गौतम अदानीसारखा पैसा असावा आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम असावा या गोष्टी वाटत असताना एखादा साहित्यिक कार्यक्रम कोकणात होतो ही मराठी भाषेची खूप मोठी सेवा आहे. यासाठी सतिश पाटणकर यांना धन्यवाद द्यावे लागतील असे गौरवोद्गार काढले.
‘कशासाच, कशाशी काही संबंध नाही
रोज काहीतरी कानावर येत असत. रोज ९ वाजता सकाळ कोणत्या बातमीने होईल सांगता येत नाही. आपण कोणाला मत दिलं अन् निवडून कोण आलं ? हे पण कळत नाही. अशा गोंधळाच्या स्थितीत आपण लोक आहोत असे फटकारे देत हास्य कवी अशोक नायगावकर म्हणाले. ‘कशासाच, कशाशी काही संबंध नाही’ या कवितेवर बोलताना, ‘प्रेयसी गेल्याची बातमी आली. तेव्हा, प्रेयसी गेल्यावर किती दिवस सुतक पाळतात हे माहित नव्हतं. म्हणून, गुरूजींकडे गेलो तर ते म्हणाले ”दुसरी प्रेयसी मिळेपर्यंत” पाळावच लागणार ! पुढे डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी खिशाला स्टेथस्कोप लावला. काय होतंय विचारलं तर सारखं सारखं ‘भाजपात जावस वाटतंय’ अशी मिश्किल टीपणीही त्यांनी केली.
कवितेपेक्षा मी मध्ये काय बोलतो हे महत्वाचे असते अस मानल जात. परवा तिळगुळ देण्यावरून आमच्याइथे मारामारी झाली. गोड बोलण्यावरून हा वाद झाला. आमचे काही कवी चांदण्यात टोपी घालून बसतात. अन् आमच्या कवीतेत बायकोही येत नाही, प्रेयसी दूरच. इतके नाजूक कवी आपल्याकडे आहेत. माझा चंद्राचा, प्रेयसीचा काही संबंध नाही. मी सुर्याचा माणूस आहे. दिवस ढकलण्याच काम करतो. मात्र,सूर्याचा एक बर असतं अंधार पडण्यापूर्वी घरी परत जाण्याच काम तो करतो, असा सामाजिक संदेशही त्यांनी दिला.
जरांगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शविती
डॉ. वसंत सावंत यांच्या संमेलनाची आठवण सांगताना व सध्याच्या जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करताना रामदास फुटाणे पुढे म्हणाले, ”जरांगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शविती. ढासळला आता सारा गावगाढा वेशीतच राडा दिग्गजांचा…!” ही कविता सादर करत श्री. फुटाणेंनी धर्म, जात व्यवस्थेवर मार्मिक भाष्य केल. नर आणि मादी या दोनच धर्म अन् जाती आपल्याकडे आहेत. धर्म जन्माला घातला त्यांचा उद्देश चांगला होता. मात्र, आज प्रचंड धर्म अन् जाती द्वेष बघायला मिळतो. तो वाढत चालला आहे. त्यामुळे व्यापून धर्म म्हणाला, ”मी काहींना पुजा दिली, काहींना प्रार्थना, मानवतेतची शिकवण दिली. यात माझं काय चुकलं ? तेव्हा जखमी जात म्हणाली व्यवसायाशी नातं जडलं तेच गळ्यात पडलं. माझं काय चुकलं ? तेव्हा ब्रम्ह म्हाणलं, जीव जन्माला घातले, ते उतले मातले. त्यात माझे क…












