नेमळेतील कर्जदारावर अन्याय : धरणे आंदोलन छेडणार
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकाधिकार समितीने शहरातील एका फायनान्स लिमिटेड विरोधात गंभीर आरोप लगावत, त्यांच्या सावंतवाडी कार्यालयासमोर धरणे निदर्शने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. नेमळे येथील श्यामसुंदर मालवणकर यांच्यावर कंपनीकडून झालेल्या अन्याविरोधात ११ फेब्रुवारी रोजी हे आंदोली छेडण्यात येणार असल्याची माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर, अविनाश पराडकर, संजय पवार, राजेश माने, विवेक नाईक आधी पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, सदर फायनान्स लिमिटेडने नेमळे येथील रहिवासी श्यामसुंदर राजाराम मालवणकर यांच्या वाहन कर्जप्रकरणात अन्यायाची आगळीक केल्याचा आरोप समितीने केला आहे. मालवणकर यांनी फायनान्सकडून कंपनीने दुसऱ्या व्यक्तिकडून कर्ज थकीत प्रकरणी जप्त केलेला डंपर खरेदीसाठी कर्ज घेतले होते.
सदरचा डंपर नावावर करून देण्यासाठी त्यांच्याकडे अधिकची ५० हजार रुपयांची मागणी गोवा येथील संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकाकडून करण्यात आली. त्यातील २५ हजार रुपये त्यांनी दिले.
दरम्यान, कर्नाटक येथील एका खाजगी कंपनीकडे सदरचा डंपर भाडेतत्त्वावर लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता मात्र वाहन नावावर नसल्याने कंपनीने असमर्थता दर्शवली या दरम्यान ते कर्जाचे नियमित हप्ते भरू शकले नाही, त्यामुळे २०१५ साली कर्ज खाते थकीत झाल्याने कोणत्याही सक्षम न्यायालयाच्या आदेशाशिवाय फायनान्स कंपनीने तो डंपर मालवणकर यांच्याकडून ताब्यात घेतला.
ऑर्बिट्रेशन अवॉर्ड विरोधात हरकत ..
श्यामसुंदर मालवणकर यांना ऑर्बिट्रेटर यांनी दिलेल्या हरकतीचा उल्लेख समितीने केला आहे. २०१८ साली मालवणकर यांना नोटीस पाठवून तब्बल ६९ लाख रुपये कर्ज थकबाकी भरण्याची मागणी करण्यात आली.
ऑर्बिट्रेटरने एकतर्फी अवाजवी व बेकायदेशीर रकमेचा ऑर्बिट्रेशन अवॉर्ड पारित केला होता, ज्याविरोधात त्यांनी विविध प्रशासकीय पातळीवर तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी अखेर यासंबंधी महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडे दाद मागितली.
समितीकडूनही विविध प्रशासकीय पातळीवर दाद मागून न्याय मिळत नसल्याने तक्रारदारावर ओढवलेल्या या अन्यायाच्या विरोधात ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता फायनान्स कंपनीच्या सावंतवाडी कार्यालयासमोर धरणे निदर्शन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.करंदीकर म्हणाले, मालवणकर यांच्याबाबत घडलेल्या प्रकारासारखे अन्य प्रकारही फायनान्स कंपन्यांकडून घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये अनेक सर्वसामान्य ग्राहक अडकले असून त्यांना नंतर मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, अशा प्रकारच्या अन्याय विरोधात कोणीच पुढे येताना दिसत नाही. त्यांच्यावर असे अन्याय झाले त्यांनी निर्भीडपणे पुढे येणे गरजेचे आहे. अशा अन्यायाविरोधात लोकाधिकार समिती निश्चितच आवाज उठवेल,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.












