नागरीक व वाहन चालकांचा सवाल
काम सुरू करण्याचे आदेश देऊनही काम सुरू नाही नगर परिषद प्रशासन ढीम्म
राजापूर (प्रतिनिधी): शहरातील जवाहर चौक ते रानतळे रस्त्याची पुरती दुरावस्था झाली असून या विरोधात आता नागरीकांतुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. या विरोधात आवाज उठवत नागरीकांनी नगर परिषदेचे लक्ष वेधलेले असताना व या रस्त्याच्या कामाचे काम करण्याचे न. प. प्रशासनाने संबधित ठेकेदाराला दिलेले असतानाही संबधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला मुहुर्त कधी मिळणार असा सवाल नागरीक व वाहक चालकांतुन उपस्थित केल जात आहे.
या नादुरूस्त रस्त्यामुळे वाहन चालक, पादचारी व परिसरातील नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. ‘खड्ड्यांनी कंबरड मोडलं आणि धुळीने रडवलं’ असे दुहेरी संकट नागरिकांवर ओढावले आहे. याबाबत १५ जानेवारी रोजी शहरातील नागरीकांनी नगर परिषदेला एक लेखी निवेदन देत पुढील आठ दिवसात हे काम सुरू करावे अन्यथा रस्ता बंद पाडू असा ईशारा दिला होता. मात्र दहा दे बारा दिवसांचा कालावधी उलटला तरी न. प. प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. न. प. प्रशासनाकडून ठेकेदारावर जबाबदार ठकलली जात आहे. आंम्ही त्याला काम सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत आता त्याचे काम आहे असे सांगुन न. प. प्रशासन बचावाचा पवित्रा घेत आहे.
शहरातील जवाहर चौक ते रानतळे रस्त्याची पुरती दुरावस्था झाली आहे. मोठया प्रमाणावर पडलेले खड्डे त्यामध्येच भर म्हणून एका मोबाईल कंपनीची लाईन टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले असुन धुळीचाही सामना करावा लागत आहे. मोठ मोठया खड्डयांमुळे गंभीर अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या परिसरातील रस्त्यावरून नदी वाहते तर उन्हाळ्यात खड्डे अन् धुळीचे साम्राज्य पसरते. त्यामुळे नागरीकांना व वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम मंजूर असून त्यासाठी निधीही उपलब्ध आहे. संबधित ठेकेदाराला सदरचे काम सुरू करण्याबाबत नगर परिषद प्रशासनाने वर्क ऑर्डरही दिलेली आहे. मात्र ठेकेदाराची मनमानी सुरूच असून त्याने काम सुरू केलेले नाही. नगर परिषद प्रशासन व ठेकेदार नागरीक, वाहनचालक व पादचारी यांच्या जीवाशी खेळत आहेत.











