कोकण कृषी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची निवड लांबण्याची शक्यता

The selection of the new Vice Chancellor of Konkan Agricultural University is likely to be delayed

दापोली | प्रतिनिधी: कोकणातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंसाठीची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यमान कुलगुरु डॉ. संजय सावंत यांचा कार्यकाळ 28 मे 2023 रोजी पूर्ण होत आहे. यासाठी नव्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांकडून नियुक्त करण्यात आलेला शोध समितीकडे उपलब्ध झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया अद्याप सुरू आहे. नवीन कुलगुरू पदासाठी इच्छुकांचे जवळपास पस्तीस ते चाळीस अर्ज या समितीकडे आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या निवडीच्या तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्या तरी 28 मे नंतर लगेचच कोकण कृषी विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे विद्यमान कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या निवृत्तीनंतर या पदाचा कार्यभार अन्य व्यक्तीकडे सोपवला जाण्याची शक्यता अधिक आहे.

कुलगुरू पदाच्या निवडीसाठी राज्यपाल महोदयांकडून नियुक्त करण्यात आलेला शोध समितीच्या अध्यक्षपदी कृषी अनुसंधान परिषदेचे निवृत्त डायरेक्टर जनरल डॉ.एस. अय्यप्पन तर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहसंचालक डॉ.पी एन साहू यांची समन्वयक म्हणून काम पाहात आहेत.तसेच अन्य दोन ते तीन कृषी शास्त्रज्ञांचा या समितीमध्ये समावेश आहे. मार्च महिन्यात नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्या नियुक्त करण्यात येणाऱ्या कुलगुरू पदासाठी इच्छुक अर्हताप्राप्त कृषी शास्त्रज्ञांकडून काही दैनिकांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून 3 एप्रिल 2023 पर्यंत उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

राज्यपाल महोदयांकडून नियुक्त करण्यात आलेल्या कुलगुरू शोधन समितीकडून प्राप्त अर्जांपैकी छाननी करून वैध ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. त्यानंतर या समितीकडून योग्य वाटणाऱ्या पाच उमेदवारांची निवड केली जाईल. व या पाच नावांची शिफारस गोपनीय पद्धतीने बंद लिफाफा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केला जाईल. राज्यपाल महोदय शिफारस करण्यात आलेल्या सबंधित पाच जणांची मुलाखत घेऊन कुलगुरू पदाच्या नावावरती अंतिम शिक्कमोर्तब करतील. त्यानंतरच राजभवनकडून नव्या कुलगुरूंच्या नियुक्तीची माहिती दिली जाईल,अशी ही सगळी प्रक्रिया आहे. त्यामुळे या सगळ्याला अजून मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांपैकी एक असून कोकण विभागाच्या कृषी व संलग्न क्षेत्रांमध्ये अध्यापन, संशोधन आणि विस्तार शिक्षण यांच्या गरजा भागविण्यासाठी या विद्यापीठाची १८ मे १९७२ रोजी स्थापना करण्यात आली. या कृषी विद्यापीठाच्या अधिपत्याखाली ठाणे, मुंबई,पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात.

महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम १९८३ व त्यात शासनाच्या दिनांक २१ जुलै २०१० ते १३ ऑक्टोबर २०२० पर्यंतच्या आदेशान्वये घोषित केलेल्या कुलगुरु पदासाठी विहीत केलेली अर्हता व अनुभव यांची पुर्तता या पदासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. यासाठी मार्च महिन्यात कुलगुरू शोधन समितीकडून इच्छुकांकडून अर्ज मागवण्यासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत या सगळ्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

या सगळ्या संदर्भात शोधन समितीचे समन्वयक असलेले डॉक्टर पी.एन. साहू यांच्याजवळ संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ही छाननी प्रक्रिया सुरू असताना पदवी ग्राह्यतेबाबत आवश्यक असल्यास माहितीही मागवावी लागते त्यामुळे छाननी प्रक्रियेला काही कालावधी जातो.

कोकणातीलच कृषी शास्त्रज्ञ कुलगुरू असायला हवा- डॉक्टर चंद्रकांत मोकल,माजी आमदार

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरती कोकणातील आसलेल्या कृषी शास्त्रज्ञाची कुलगुरू म्हणून निवड होणे आवश्यक आहे. त्याला आमच्या कोकणातील आंबा, काजू ,नारळ, सुपारी, मासाले पीके या सगळ्याची माहिती व अभ्यास असेल अशीच व्यक्ती कुलगुरू पदावरती असायला हवी. या कृषी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरु डॉक्टर संजय सावंत हे मूळचे कोकणातले कणकवली येथील असेल तरी त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने नाशिक पुणे परिसरात द्राक्ष कृषी शास्त्रज्ञ म्हणून राहिले आहे. यामुळे कोकण कृषी विद्यापीठाच्या एकूणच कामगिरीवर मोठा विपरीत परिणाम झाला. त्यामुळे राष्ट्रिय स्तरावर नावाजलेले व उत्तम दर्जा अस मानांकन असलेल्या या कृषी विद्यापीठाच्या मानांकनात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे यापुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विभागाच्या कुलगुरू पदावर कोकणातील कृषी शास्त्रज्ञाचीच निवड होणे आवश्यक असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया दापोलीचे माजी आमदार व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य डॉ. चंद्रकांत मोकल यांनी दिली आहे.

दरम्यान ही छाननी प्रक्रिया सुरू आहे असे सांगण्यात येत असले तरी 28 मे रोजी काही इच्छुक उमेदवारांची निवड करून कुलगुरू निवड समितीने मुलाखतीसाठी बोलावले आल्याची खात्रीलायक माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे छाननी प्रक्रिया लवकरात लवकर करण्याची नियोजन कुलगुरू निवड समितीकडून करण्यात आल आहे. या छाननी प्रक्रियेदरम्यान कोणत्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज वैध अथवा अवैध ठरतात हे आता 28 मे रोजी स्पष्ट होणार आहे.