दापोलीत ऑपरेशन शिवधनुष्य मोहिम सुरू, अनेक गावांमध्ये परिवर्तनाचा विश्वास
दापोली l प्रतिनिधी:- गेली आठ वर्षे विविध आव्हानांचा सामना करत आपल्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा झेंडा डौलाने फडकावला आहे. 2019 ला शिवसेना विरूध्द सर्व पक्ष तर 2024 ला महायुती विरूध्द महाविकास आघाडी असा सामना असतानाही शिवसैनिकांच्या मेहनत व निष्ठेमुळे मला 25 हजार मतांचे मताधिक्य मिळाले असून यामध्ये आंजर्ले गावाचाही मोलाचा वाटा असल्याचे मत राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांनी व्यक्त केले.
दापोली तालुक्यातील आंजर्ले कातळवाडी येथील उबाठा पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंगेश महाडीक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षामध्ये ना. योगेश कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला व संपूर्ण राज्याप्रमाणेच दापोली तालुक्यातही ऑपरेशन शिवधनुष्य मोहिम सुरू झाल्याचे संकेत दिले. यावेळी आपल्या मनोगतात ना. योगेश कदम म्हणाले की, आंजर्ले गावामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित होते. आंजर्ले गावची पाणी योजना हा ज्वलंत विषय होता. माझ्या आमदारकीच्या पहिल्या कालखंडात हा प्रश्न मी सोडवला आहे. आंजर्ले गावामध्ये अनेक विकासकामे माझ्या माध्यमातून झाली आहेत. विकास कामांबरोबरच पुढील काळात रोजगारालाही महत्व देण्याची गरज असून कासवांचे गाव म्हणून आंजर्ल्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. तसेच कडयावरील गणपतीमुळे हा परिसर महाराष्ट्रात ओळखला जातो. पुढील काळात आंजर्लेतील किनारपट्टी परिसर असेल किंवा गणपती मंदिर परिसर असेल त्याचे सुशोभीकरण करून पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करून स्थानिकांना रोजगार देण्याचे काम आपण निश्चितच सर्वांच्या सहकार्याने करणार आहोत.
मागील पाच वर्षात दापोली मतदार संघाच्या विविध विकासकामांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत साडेतीन हजार कोटीचा निधी आणण्यात आपण यशस्वी झालो. त्या काळखंडात निसर्ग चक्रीवादळ, खेड येथील महापूर, कोरोनाची महामारी असे विविध विषय असतानाही हा निधी मतदार संघात आणला गेला आहे. आतातर आपण मंत्री असून पुढील दोन वर्षाच्या कालखंडात साडेतीन हजार कोटी रूपयांचा निधी आपण नक्कीच आणू व दापोली मतदार संघ हा बारामती सारखा नव्हे तर बारामतीपेक्षाही जास्त विकासात्मक असल्याचे निश्चितच दाखवून देऊ. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत आंजर्ले गावामध्ये अनेकांनी छुप्या पध्दतीने मला पाठिंबा दिला असून त्यांचे योगदान आपण निश्चितच विसरणार नाही. गावचे सरपंच व आमदार हे एकाच विचाराचे असतील तर गावाचा विकास हा झपाटयाने होतो. गावच्या विकासासाठी सरपंचानी पुढाकार घेऊन सातत्याने पाठपुरावा केला तर जादा निधी मिळू शकतो, असे मतही यावेळी ना. योगेश कदम यांनी व्यक्त केले. श्री. मंगेश महाडीक हे स्वतः दिव्यांग असूनही त्यांचा गावच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असतो. विकास कामांसाठी कसा पाठपुरावा करावा याची मंगेश महाडीक यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. मंगेश महाडीक यांच्यासमवेत उबाठातील अनेक कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये दाखल झाले असून या पक्षप्रवेशामुळे आंजर्ले गाव हा पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला झाला असून यापुढील काळात केळशी जिल्हा परिषद गट पूर्वाप्रमाणे पुन्हा भगवामय होईल असा विश्वास तालुकाप्रमुख उन्मेष राजे यांनी व्यक्त केला. श्री. मंगेश महाडीक यांनी यावेळी जनतेच्या आशिर्वादामुळे 50 वर्षानंतर दापोली विधानसभा मतदार संघाला मंत्रीपद मिळाले असून विकास कामे करण्याची ना. योगेशदादांची तडफ पाहता दापोली मतदार संघ हा विकासापासून निश्चित वंचित राहणार नाही आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असून यापुढील काळात संपूर्ण आंजर्ले गाव हे शिवसेनामय झालेले पहावयास मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर माजी सभापती किशोर देसाई, माजी सभापती प्रकाश कालेकर, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनिल दळवी, यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, परिसरातील सरपंच व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.












