करंबेळेवाडी कोंडवी ग्रामस्थांचा क्रांतिकारी निर्णय
संतोष कोत्रे l लांजा-: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी आजही आपल्या समाजात विधवा स्त्रियांना हळदी कुंकू कार्यक्रमासह ईतर सर्वच धार्मिक कार्यक्रमात एक प्रकारे डावलले जाते. त्यांना या कार्यक्रमात ताठ मानेने सहभागी होता येत नाही. त्यांची हीच होणारी अवहेलना लक्षात घेऊन त्यांना यापुढे हळदीकुंकूसह सर्वच धार्मिक कार्यक्रमात सामावून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय तालुक्यातील गवाणे गावातील करंबेळेवाडी कोंडवी ग्रामस्थांनी घेतला आहे. नुकत्याच झालेल्या वाडीच्या हळदीकुंकू कार्यक्रमात या सर्व उपेक्षित अशा विधवा महिलांना अन्य सुहासिनी स्त्रियांप्रमाणेच वाण देऊन खऱ्या अर्थाने या वाडीने तालुक्यासमोर एक आदर्श घालून दिला आहे.
आपल्या समाजात अनेक वर्षांपासून विधवा स्त्रियांना उपरोधिक वागणूक मिळते. मात्र आता हळूहळू जग बदलत चालले आहे. अनिष्ट प्रथांना फाटा देऊन चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला जाणे गरजेचे आहे. यांचे चांगले उदाहरण घालून दिले आहे ते गवाणे करंबेळेवाडी कोंडवी ग्रामस्थांनी. शासनाच्या विधवा प्रथा बंद करणे जीआर चा आदर राखत या वाडीने गेल्यावर्षी हळदी कुंकु कार्यक्रमाच्या निमित्ताने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. एवढ्यावरच न थांबता एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास यानंतर होणारे विधवा पत्नीचे विधी अर्थात कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र गळ्यातून काढणे, आरती उलटी टाकणे असे विधी न करण्याचा क्रांतिकारी निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता.
तसेच बाराव्या दिवशी नातेवाईकांकडून कपडे (टॉवेल व इतर) दिले जातात. न देता त्या बदल्यात आर्थिक स्वरूपात त्या कुटुंबाला मदत करण्याचाही एक चांगला निर्णय करंबेळेवाडी कोंडवी ग्रामस्थांनी घेतला होता. आणि केवळ निर्णय न घेता प्रत्यक्ष त्याची सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. निश्चितच ही बाब वाखाणण्याजोगी आहे. कारण पतीच्या निधनानंतर संबंधित महिलेला मानसिक आधारा बरोबरच आर्थिक आधाराचीही तितकीच गरज असते.
वरील अनेक चांगले निर्णय घेण्याच्या गोष्टीला एक वर्ष पूर्ण होते न होते तोच करंबेळेवाडी कोंडवी ग्रामस्थांनी विधवा महिलांसाठी आणखी एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय खरोखरच क्रांतिकारक म्हणायला हरकत नाही. समाजामध्ये हळदी-कुंकवाच्या दिवशी विधवा स्त्रियांना मानसन्मान मिळत नाही. वाडीतील विधवा महिला या गोष्टीपासून अलिप्त असतात. नामकरण विधी, वास्तुशांती, लग्न आदी कार्यक्रमात देखील विधवा महिलांना इतर महिलांप्रमाणे समाज काहीतरी बोलेल या विचाराने सामील होता येत नाही.या गोष्टीचा विचार करून करंबेळेवाडी कोंडवी ग्रामस्थांनी विधवा महिलांना सर्वच धार्मिक कार्यक्रमात मानाने सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरूवात हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विधवा महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करून करण्यात आली.
आज पुरुषांच्या बरोबरीने महिलाही प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. एक स्त्री आई, बहिण, पत्नी, वहिनी आदी भूमिका बजावत असते.त्यांना समाजामध्ये वावरताना एकटे वाटू नये म्हणून अशा प्रकारचे निर्णय वाडीवाडीत होणे गरजेचे आहे. करंबेळेवाडी कोंडवी यांनी एक वर्षांपूर्वी विधवा प्रथा बंद करण्याचा घेतलेला निर्णय गवाणे गावात रामानेवाडी, गवळीवाडी यांनीही स्वीकारलेला आहे. तर करंबेळेवाडी कोंडवी ग्रामस्थांचा आदर्श पुढे गावांमधील इतर वाड्या घेतील अशी अपेक्षा आहे. या निमित्ताने मुकुंद केशव करंबेळे यांनी या विषयावर सुंदर गीत गायन करून समाजामध्ये प्रबोधन करण्याचे काम केले.
दरम्यान, या कार्यक्रमाला गवाणे गावचे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष गोविंद करंबेळे, पोलीस पाटील रविंद्र कोटकर, करंबेळे कोंडवी वाडीचे अध्यक्ष आत्माराम करंबेळे ,सर्व पदाधिकारी, महिला मंडळ पदाधिकारी, उपसरपंच सूर्यकांत मोहिते, ग्रामपंचायत सदस्य सौ. करंबेळे, मनोहर करंबेळे व ग्रामस्थ उपस्थित होते.











