राजापूर (वार्ताहर): राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई व वाटूळ ग्रामस्थ आयोजित दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन वाटूळ ता. राजापूर येथील वै.ह.भ.प. श्री हरिभाऊ रामचंद्र चव्हाण साहित्य नगरीत ०१ फेब्रवारी पासून रंगणार असून मराठी मालिका, नाटक, चित्रपट विश्वातले लेखक दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध अभिनेते राजेश देशपांडे यांची प्रकट मुलाखत हे संमेलनाच्या दुसऱ्या परिसंवाद सत्राचे विशेष आकर्षण असणार आहे.
राजेश देशपांडे हे नाव मराठी माणसाला नवं नाही. ‘करून गेलो गाव’सह ‘गंगूबाई’ आणि ‘पॅडी’ यांच्या ‘कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक’ या मालिकेनं ते घराघरांत पोहोचले. दरम्यान त्यांनी ‘धूडगूस’, ‘गंगूबाई नॉनमॅट्रिक’ यांसारखे सिनेमे केले, लिहिले. शिवाय, ‘१७६० सासूबाई’, ‘तुझं माझं जमेना’, ‘काय पाहिलंस माझ्यात’ अशा मालिकाही केल्या. मुंबईतील प्रसिद्ध व्याख्याते, समुपदेशक दिनेश मोरे हे ग्रामीण मराठी संमेलनाच्या परिसंवाद सत्रात लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे यांची मुलाखत घेणार असून राजेश देशपांडे यांचा कोकणातून मायानगरी मुंबईतील सुरवातीचा संघर्ष ते यशस्वी लेखक दिग्दर्शक अभिनेता हा जगणे समृद्ध करणारा प्रवास रसिकांसमोर उलगडणार आहे.
राजापूर तालुक्यातील येळवण हे राजेश देशपांडे यांचे मूळ गाव. प्रसिद्ध शिक्षणप्रेमी,सामाजिक कार्यकर्ते चंदुभाई देशपांडे हे त्यांचे वडिल होय. चंदुभाई यांनीही युवावस्थेत मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांच्या सोबत काही काळ काम केले होते. त्यांचाच वारसा जपणारे राजेश देशपांडे सृजन द क्रिएशन या संस्थेच्या माध्यमातून नव कलाकारांना घडविल्याचे कार्य करीत असून साहित्य क्षेत्रातही त्यांचा मोठा वावर असून त्यांच्या याच वाटचालीचा उलगडा संमेलनात होणार असून आस्थावान साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघ अध्यक्ष सुभाष लाड यांनी केले आहे.












