शिवसेना शहर प्रमुख सौरभ खडपे यांची माहिती
पालकमंत्री ना. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नाने शहर विकासाला नवी दिशा मिळणार
राजापूर | प्रतिनिधी : राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातुन व राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत, राजापूरचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या विशेष पाठपुराव्याने राजापूर शहरातील विविध रस्ते, सरंक्षण भिंती, गटार व अन्य अशा सुमारे ३७ महत्वपुर्ण कामांना जिल्हा नियोजनमधून साडे कोटी ८०लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख सौरभ खडपे यांनी पत्रकारांना दिली आहे.
या सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन काम करण्याचे आदेश संबधितांना देण्यात आले असून लवकरच या कामांचा शुभारंभ होऊन ही कामे मार्गी लागणार असल्याचे खडपे यांनी सांगितले.
राजापूर शहरातील विविध प्रभागांतील रस्ते व अन्य कामे प्रलंबीत होती. तर शहरातील भटाळीकडे जाणारा रस्ता, जवाहर चौक ते रानतळे रस्ता देखील नादुरूस्त झाला होता. तर कोंढेतड भागातील रस्ता रूंदीकरण, धोपेश्वर निशाण घाटी रस्ता यांसह शहराच्या सर्वांगिण विकासाचा विचार करून सर्व भागात आवश्यक असलेली विकास कामे यामध्ये समाविष्ठ करून आ. किरण सामंत यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध केला आहे.
यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व पुर्तता करून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. अशा प्रकारे शहरातील या विविध ३७ कामांना चार कोटी ८० लाखाचा निधी उपलब्ध झाला असून ही कामे लवकरात लवकर मार्गी लागणार असल्याचे खडपे यांनी सांगितले. न. प. प्रशासनाकडून या कामांच्या प्रारंभाचे आदेश देण्यात आले असून लवकरच ही कामे सुरू होणार असुन ३१ मार्च पर्यंत ही सर्व कामे पुर्ण केली जाणार असल्याचे खडपे यांनी सांगितले. यामध्ये रस्ते, संरक्षण भिंत, गटार व अन्य त्या त्या भागातील आवश्यक कामांचा समावेश असल्याचे खडपे यांनी सांगितले.
राज्यातील महायुती सरकाराच्या माध्यमातुन व राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत व आ. किरण सामंत यांच्या विशेष पाठपुराव्याने हा निधी उपलब्ध झाल्याबद्दल शहर वासीयांच्या वतीने खडपे यांनी शासनाचे तसेच ना. सामंत व आ. सामंत यांचे आभार मानले आहे.









