‘Trial run’ of ‘Vande Bharat’ on Konkan railway route successful
कोंकणचा प्रवासही आता होणार ‘सुपरफास्ट’ ..
लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकणवासीयांची ‘वंदे भारत ‘ एक्स्प्रेसची प्रतीक्षा अखेर संपणार असून
कोकणातील प्रवास अधिक सुखकारक आणि वेगवान होणार आहे. कारण कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार आहे. मंगळवारी या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात आली. दुपारी १२ वाजता ही ‘वंदे भारत’ एक्सप्रेस महाराष्ट्रातील शेवटचे रेल्वे स्थानक असणाऱ्या सावंतवाडीतून गोव्याच्या दिशेने रवाना झाली. मुंबई ते मडगांव या दरम्यान ही ट्रायल रन घेण्यात आली. कोकण रेल्वे मार्गावर चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसला कोकण रेल्वे मार्गावर हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. त्यामुळे लवकरच कोकणवासीयांना या रेल्वेने प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे.
पंतप्रधानांची नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना ‘मेक इन इंडिया’ला केंद्रस्थानी ठेवून रचना आणि निर्मिती करण्यात आलेली ‘वंदे भारत एक्स्प्रेस ‘ आता कोकण रेल्वे मार्गावरही धावणार आहे. वंदे भारत रेल्वेचे डबे सुसज्ज असणार आहेत. बुधवारी मुंबईवरुन चाचणीसाठी निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाली. मुंबई ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात आली.या ट्रायल रनसाठी मुंबईच्या सीएसएमटी जंक्शन इथून सकाळी निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाली. ही एक्स्प्रेस दुपारी बारा वाजता सावंतवाडीत तर अडीच वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाली. कोकण रेल्वे मार्गावरील ही ट्रायल रन यशस्वी झाली असून या मार्गावरुन १६ डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट धावली. या एक्स्प्रेसमध्ये एकूण १६ एसी डबे असतील, ज्यापैकी दोन डबे एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी असणार आहेत.
दरम्यान, भारतीय रेल्वेने सुरु केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही एक्स्प्रेस अनेक ठिकाणी सुरु करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. सध्या राज्यात तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. लवकरच राज्यात चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई- गांधीनगर दरम्यान सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस धावली. त्यानंतर मुंबई- शिर्डी अशी तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस धावली. आता चौथी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. तळकोकणात देखील या एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.