नौदल व्हाईस चीफ पदी दिनेश कुमार त्रिपाठी

मालवण तारकर्ली येथील नौदल दिन यशस्वीतेत त्रिपाठी यांचेही मोठे योगदान

मालवण | प्रतिनिधी : नौदल व्हाइस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांना पदोन्नती मिळाली आहे. व्हाईस अॅडमिरल त्रिपाठी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड म्हणून कार्यरत आहेत, जानेवारीच्या सुरुवातीला नौदल व्हाईस चीफ म्हणून ते कार्यभार स्वीकारणार आहेत.

भारत सरकारने अनेक उच्च-पद नियुक्त्यांना नुकतीच मंजुरी दिली आहे. त्रिपाठी यांचा नौदल क्षेत्रातील व्यापक अनुभव आणि नेतृत्व कौशल्य यामुळे त्यांची या महत्त्वाच्या पदासाठी निवड झाल्याचे बोलले जात आहे.

पहिल्यांदाच नौदल तळा पासून दूर तारकर्ली येथे भारतीय नौदलाने आपला नौदलदिन साजरा केला. हा कार्यक्रम. यशस्वी करण्यामध्ये त्रिपाठी यांचेही मोठे योगदान होते.

दिनेश कुमार त्रिपाठी १९९५ मध्ये नौदलात नियुक्त झाले होते. नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (एन डी ए) मधून अधिकारी म्हणून पुढे आलेले दिनेश कुमार आता नौदलात नंबर दोनचे स्थान घेणार आहेत. त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी यूएस नेव्हल वॉर कॉलेजमधून नेव्हल हायर कमांड कोर्सही केला.

त्यांनी वॉर कॉलेजमध्ये प्रतिष्ठित रॉबर्ट ई. बेटमन आंतरराष्ट्रीय पुरस्कारही जिंकला आहे. व्हाईस अॅडमिरल त्रिपाठी हे संप्रेषण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध विशेषज्ञ मानले जातात. आपल्या शानदार कारकिर्दीत त्यांनी वीर श्रेणीचे क्षेपणास्त्र जहाज INS विनाश आणि कोरा श्रेणीतील कॉर्व्हेट INS किर्चचे नेतृत्व केले आहे. त्यांनी तलवार श्रेणीच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट आयएनएस त्रिशूलचेही नेतृत्व केले आहे.