खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील शिरवली नं.१ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी १० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे नव्याने
काम देखील पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही नव्या वर्गखोल्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
सद्यस्थितीत अंगणवाडीतच विद्यार्थी अध्ययन करत आहेत. त्यामुळे एवढा खर्च करुनही नव्या वर्गखोल्यांमध्ये शाळा का भरवली जात नाही, या मागचे कारण अजूनही समोर आलेले नाही
जुलै महिन्यात शिरवली नं. १ प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांचे छत कोसळले होते. इ. १ली ते ७वीपर्यंत
वर्ग असणाऱ्या शाळेचे छत कोसळल्यानंतर यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका लक्षात घेता सलग ६ दिवस विद्यार्थ्यांअभावी शाळा भरली होती. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनीही एकत्र येत दंड थोपटले होते. ‘अखेर ग्रामस्थांच्या आक्रमकतेनंतर वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसह अन्य कामांसाठी १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केली होती. यानंतर वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे
काम हाती घेण्यात आले.
वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसह रंगरंगोटीचे काम देखील पूर्ण करण्यात आले आहे. मात्र अजूनही नव्या
वर्गखोल्यांमध्ये वर्गच भरले जात नसल्याने पालकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नव्या वर्गखोल्यांमध्ये शाळा न भरवण्याचे नेमके कारण तरी काय, आणखी किती दिवस अंगणवाडीत विद्यार्थी धडे गिरवणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात असून याबाबत लवकरात लवकर कार्यवाहीची मागणी होत आहे.









